प्रतापगड परिसरात बिबटय़ाची शिकार करून कातडी महाबळेश्वर येथे विकण्यासाठी जात असताना पोलादपूर येथील चौघांना वन विभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली.
प्रतापगडाच्या घनदाट जंगलात बिबटय़ाची शिकार करून त्याचे कातडे महाबळेश्वर येथे विकण्यासाठी येत असताना वन विभागाच्या कर्मचा-यांनी सापळा रचून प्रतापगडच्या पायथ्याशी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. एका टाटा सुमोची झडती घेतली असता त्या गाडीतील लोकांच्या प्लॅस्टिक पिशवीत बिबटय़ाचे कातडे आढळून आले. कातडे खरे असल्याची खात्री पटताच चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमो गाडीसह दोन लाख ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
दगडू तुकाराम पवार (वय ४८), प्रदीप नारायण दाभेकर (वय २५), अनिल पांडुरंग पवार (वय २७), सर्वजण रा. किनश्वरवाडी, पो. चांभारगणी, ता. पोलादपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना शिकारीसाठी मदत केलेल्या सोपान नारायण उतेकर (वय ३२) रा. चांदळे, पो. बोरघर, ता. पोलादपूर याच्या घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. अनिल पवार याच्या घराच्या झडतीत सांबराच्या शिंगाचे दोन तुकडे मिळाले. मुख्य सूत्रधार फरारी आहे. या सर्वाना न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.