-दत्तात्रय भरोदे

करोना रुग्णांचा तीन हजाराचा टप्पा पार केलेल्या शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आकडेवारीवरून येथील करोनाचा संसर्ग मात्र आता संपुष्टात आल्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींपैकी अवघ्या १४ ग्रामपंचायती रेड झोन मध्ये असून गेल्या २७ दिवसांत करोना रुग्ण आढळून न आल्याने तब्बल ९६ ग्रामपंचायती ग्रीन झोन मध्ये आल्या आहेत.  यामुळे करोनाचा फैलाव होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला, तरी गेल्या काही महिन्यातील करोनाने घातलेल्या मृत्यूच्या तांडवामुळे सतर्कता म्हणून नागरिकांनी खबरदारी व स्वसुरक्षितता पाळण्याची अजूनही नितांत गरज असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शहापूर तालुक्यातील करोना रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली होती. आसनगाव येथील जोंधळे महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर, फिवर क्लिनिक व कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मार्च पासून थैमान घातलेल्या या करोनामुळे पूर्णतः ठप्प झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. करोनाची महामारी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी शासनाकडून केली जात होती. याबाबत अजूनही सुरक्षितता पाळण्यात येत आहे. मार्च पासून शहापूर तालुक्यात तब्बल ३ हजार ३६९ रुग्ण करोनाबाधित झाले असून, ३ हजार २३४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. मात्र करोनाने तालुक्यातील ११८ रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे.

दरम्यान, तालुक्यात गेल्या २० दिवसात करोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नसल्याने करोना आता जवळपास संपुष्टात आला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तालुक्यात ११० ग्रामपंचायती असून गेल्या २७ दिवसांत करोनाचा एकही रुग्ण आढळून न आलेल्या ९६ ग्रामपंचायती असून या  ग्रामपंचायती ग्रीन झोन मध्ये आल्या आहेत. तर १४ ग्रामपंचायतीमध्ये करोनाचे तुरळक रुग्ण आढळून येत असल्याने वासिंद, आसनगाव, चेरपोली, खर्डी, लाहे, मोखावणे, सारमाळ, सापगाव, दहागाव, रानविहिर, बोरशेती, बिरवाडी, खराडे व गोठेघर या १४ ग्रामपंचायती मात्र रेड झोन मध्ये आहेत. दरम्यान, करोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी सांगितले.