राज्यात सध्या सर्वांचं लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात खरी लढत होती. त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्लीत कोणाचे सर्वाधिक खासदार जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संजय शिरसाट म्हणाले, “६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. माझ्याही संपर्कात आहेत. आमच्याच नियमित चर्चाही होतेय. योग्यवेळेला योग्य निर्णय घेण्याची शिंदेंची स्ट्रॅटेजी आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील.

दरम्यान, या काळात अजित पवार यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. ते म्हणाले, “अजितदादांकडेसुद्धा अनेकजण येणार आहेत. कारण, आता शरद पवार गटाला कंटाळले आहेत. त्या गटात चाललेली हुकूमशाही, मीपणा आणि अहंभाव यामुळे आमदार कंटाळले. ते अजित दादांच्या संपर्कात आहेत.”

हेही वाचा >> Pune Porsched Accident : “अपघाताची…”, अल्पवयीन मुलाच्या आईने चालकाकडे केली होती विनंती

विधानसभा निवडणुकीचे वेध

२० जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे त्यांच्या काही आमदारांसह बाहेर पडले. त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनेचा दर्जा दिला. बरोबर वर्षभराने म्हणजेच १ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्ताधारी पक्षाला समर्थन दिलं. यामुळे राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष निर्माण झाला. या सत्तासंघर्षामुळे लोकसभा निवडणूक चुरचीशी ठरली. ऐनवेळी अनेक इच्छूक उमेदवारांनी पक्षांतर केलं. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही गेले. आता विधानसभा निवडणुकीतही तेच होणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक प्रचंड चर्चेची आणि हायवोल्टेज राहणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षात कोण जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.