पुणे पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांच्या चालकावर दबाव टाकण्यात येत होता. अपघात घडला तेव्हा तो स्टेअरिंगवर होता आणि अल्पवयीन मुलगा मागे बसला होता, असा जबाब दे अशी धमकी मुलाच्या वडिलांनी चालकाला दिली होती. तसंच, मुलाला सहीसलामत सोडण्याकरता त्याच्या आईनेही चालकाकडे गयावया केल होती, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत माहिती देताना अमितेश कुमार टाईम्स ऑफ इंडियाला म्हणाले, आम्ही चालकाचा जबाब नोंदवला आहे. त्याने नमूद केलं की रविवारी पहाटे २.४५ च्या सुमारास अपघातानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला फोन करून बोलावले. अपघात झाला तेव्हा तो कारच्या स्टेअरिंगवर होता असं सांगण्यास चालकावर दबाव टाकण्यात आला होता. यावेळी बिल्डरच्या पत्नीनेही भावनिक होऊन त्याला अपघाताची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती.

चालकाने जबाब दिला, पण पोलिसांनी विश्वास ठेवला नाही

कुटुंबीयांनी त्याला अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दिली होती. अपघातानंतर त्याचे मित्र आणि चालकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सुरुवातीला चालकाने आपणच गाडी चालवत होतो असं सांगितलं. परंतु, पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला गेला, असं पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

चालकाला ठेवलं होतं डांबून

रात्री ११ च्या सुमारास या बिल्डरने चालकाला सोडवून घेऊन गेले होते. त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला आणि त्याला मुलाच्या आजोबांनी डांबून ठेवलं. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा असा दबाव टाकण्यात आला होता, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

दुसऱ्या दिवशी चालकाची पत्नी आणि त्याच्या घरातले सदस्य अल्पवयीन मुलाच्या घरी गेले, तिथे त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्या चालकाला त्याचे घरातले लोक अल्पवयीन मुलाच्या घरुन स्वतःच्या घरी घेऊन गेले. चालक त्याच्यावर टाकण्यात आलेल्या दबावामुळे घाबरला होता. ड्रायव्हरला गिफ्ट आणि पैशांचं आमिष देण्यात आलं होतं अशी माहिती मुलाच्या आजोबांना अटक केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

त्या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरविरोधात गुन्हा दाखल

या अपघातानंतर सोशल मीडियावर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. या गाण्यातील मुलगा अल्पवयीन आरोपी असून तो आपल्या कृत्याचे समर्थनार्थ गाणं गात असल्याचे दिसते. त्यामुळे या घटनेबद्दल आणखीच चीड निर्माण झाली होती. आता हे रॅप साँग गाणाऱ्या तरूणाविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsched accident accident the mother of the minor child said to the driver sgk