राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या अंतरिम तरतुदींचा उल्लेख केला. तसेच, अयोध्या व श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्याची मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली. या घोषणेला सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी बाकं वाजवून दाद दिली. जवळपास तासभर चाललेल्या आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी मराठी भाषा दिनाचं निमित्त साधत कवी कुसुमाग्रज यांच्या एका कवितेच्या माध्यमातून टोला लगावला!

९९ हजार २८८ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प!

अजित पवार यांनी आज तब्बल ६ लाख ५२२ कोटींचा अर्थसंकल्प मांडला. या आर्थिक वर्षासाठी महसूल जमा ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये तर महसूली खर्च ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये अंदाजित आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात ९ हजार ७३४ कोटी रुपयांची महसूली तूट अपेक्षित असल्याचं अजित पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले.

“राज्यातील राजकोषीय व महसूली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानं निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरलं आहे. २०२४-२५ ची राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपये आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.

कवितेतून विरोधकांना टोला!

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनाचं निमित्त साधून अजित पवार यांनी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेतील काही ओळींचा उल्लेख करत विरोधकांना टोला लगावला. “अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच. त्या ठरलेल्याच असतात. अंतरिम अर्थसंकल्प विरोधकांनी त्यांच्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा विचार करायला हवा. आज ज्यांची जयंती आहे, त्या कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचं तर ‘प्रकाश पेरा आपुल्या भोवती, दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका…भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका”, असं अजित पवारांनी म्हणताच सत्ताधारी बाकांवरच्या आमदारांनी त्यांना दाद दिली.

सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…

महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर शायरी!

दरम्यान, अजित पवारांनी लेक लाडकी योजनेचा उल्लेख करताना शायरीही म्हणून दाखवली.

“बिजली चमकती है, तो आकाश बदल देती है,

आंधी उठती है तो दिन रात बदलती है,

जब गरजती है नारीशक्ती, तो इतिहास बदल देती है”

असं म्हणत अजित पवारांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनेची माहिती दिली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली.