शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा एनडीएत यावं असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबारच्या सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांमध्ये पंतप्रधान मोदी यांचे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या अर्थाने हे विधान केलं, हे मला माहिती नाही. मात्र, माध्यमांमध्ये ज्यापद्धतीने त्यांचे विधान दाखवले जात आहे. तसं ते नक्कीच नाही. त्यांचं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहेत. ते विधान मला पूर्णपणे राजकीय वाटते. त्यामुळे राजकीय विधानावर माझ्यासारख्याने लगेच व्यक्त होणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसेच प्रतिक्रिया देण्यापूर्वी एखाद्या विधानाचा मतितार्थ काय हे समजून घेणं आवश्यक आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “काय रे बाबा तुला पैसे मिळाले नाहीत का?” अजित पवारांचा सवाल अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला; नेमकं काय घडलं?

विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर :

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर ते निवडणुकीतील पराभवामुळे अस्वस्थ आहेत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या टीकेलाही अजित पवार यांनी प्रत्यु्त्तर दिलं. “निवडणुकीदरम्यान अशा टीकेला माध्यमांनी गांभीर्याने घेऊ नये. या काळात वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत असतात. असा आरोपांवर लक्ष देण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. राजकारण काम करताना मी टीका-टीप्पणीला जास्त महत्त्व देत नाही”, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.