काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार नीलेश राणे यांच्या प्रचारासाठी आज (११ एप्रिल) कोकणात येत असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांची उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याशी दिलजमाई घडवणार का, याबाबत येथील राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.
राणे यांनी सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांबाबत फोडाफोडीचे राजकारण केल्याचा, तसेच जिल्ह्य़ातील विविध समित्यांवरील नेमणुका आणि योजनांच्या लाभापासून राष्ट्रवादी काँग्रेसला कटाक्षाने दूर ठेवल्याचा येथील आमदार दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष बाळ भिसे व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आघाडी असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकत्रे प्रचारापासून दूर राहिले आहेत. हरप्रकारे प्रयत्न करूनही त्यांच्या भूमिकेत बदल झालेला नाही. यावर अखेरचा उपाय म्हणून राणे यांनी उद्या अजित पवार आणि रविवारी (१३ एप्रिल) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या आहेत. या सभांपासूनही दूर राहण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. पण उद्या अजितदादा प्रत्यक्ष कणकवलीत आल्यानंतर हा तणाव कशा प्रकारे हाताळतात, तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अजितदादांपाठोपाठ रविवारी ‘थोरल्या साहेबां’ची सभा आयोजित करून राणेंनी या कार्यकर्त्यांना वाकवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
तीन वर्षांत तेरा सदस्य काँग्रेसवासी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण करण्याच्या दिशेने उद्योगमंत्री राणे यांनी योजनापूर्वक पावले टाकली असून गेल्या तीन वर्षांत राष्ट्रवादीचे तेरा सदस्य काँग्रेसवासी झाले आहेत. वेंगुर्ले नगर परिषदेचे सात सदस्य आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रत्येकी पाच सदस्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असून त्याबाबत काही चर्चा करण्यापूर्वी काँग्रेसवासी झालेल्या या सतरा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.  अजितदादांची प्रचारसभा आज सकाळी ११ वाजता कणकवलीत होणार असून त्यानंतर दुपारी ४ वाजता रत्नागिरीतही त्यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची संयुक्त प्रचारसभा सावंतवाडीत १३ एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे.