सत्तेचा लोभ ठेवून जनतेशी नाळ तोडू नका, उलट पक्ष कार्यकर्ते व जनतेशी अधिक संपर्क वाढवा, असे निर्देश देत आपसात वादविवाद न करता एकत्रितरीत्या  काम करण्याची ताकीद अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील मंत्र्यांना दिली. मंत्र्यांमधील मतभेद चव्हाटय़ावर येतात, एकमेकांवर टीका केली जाते, हे योग्य नसल्याचे शहा यांनी ठणकावले. मंत्रिमंडळ बैठकांमध्येही मतभेद करण्याऐवजी तत्पूर्वी बैठक घेऊन मतैक्य करावे, अशी सूचना त्यांनी केली. जनसंपर्कासाठी ‘गुजरात पॅटर्न’ राबविण्याची त्यांची सूचना आहे. दरम्यान, शहा यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र घटकपक्षांना महामंडळांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.
शहा यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांची एक बैठक शनिवारी रात्री उशिरा घेतली. त्या वेळी त्यांनी सविस्तरपणे विविध बाबींची चर्चा केली. पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आणि जनतेची कामे होत नाहीत, अशी तक्रार होती. त्यासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना शहा यांनी केली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सूत्रबद्धपणे सर्व बाबींची रचना केली होती, त्याची माहिती शहा यांनी दिली. जनतेला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या कामांसाठी सोमवार दिला होता. राज्यभरात दौरे करण्यासाठी शनिवार ठरविला होता. त्या धर्तीवर जनसंपर्क, बैठका व दौऱ्यांचे नियोजन करावे, असे निर्देश शहा यांनी दिले.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ाला कमी प्रतिनिधित्व आहे, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर शहा हे फारसे राजी नसले तरी त्यास परवानगी मिळाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र चारही घटकपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही. त्यांच्यापैकी काहींची महामंडळावर बोळवण केली जाणार आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणाकडे कोणते महामंडळ असावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. पुढील महिन्यात हे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

मंत्र्यांची दररोज जनताभेट
*सध्या मंत्र्यांकडे मंत्र्यालयातील कार्यालयात आणि निवासस्थानी जनतेची खूप गर्दी असते. त्यामुळे जनतेसाठी नीट वेळ दिला जात नाही.
*पदाधिकारी व कार्यकर्ते कोणतीही कामे घेऊन आले की, त्यांना वेळ देता येत नाही, अशी तक्रार होती. सरकार बदलले तरी सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, अशी भावना निर्माण झाली होती.
*जनतेपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याची सूचना शहा यांनी दिल्याने आता प्रदेश कार्यालयात दररोज एक मंत्री जनतेसाठी उपस्थित राहतील. यामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश राहणार आहे.

दररोज एक मंत्री भाजप कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडविणार
सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका, जनतेची कामे करा आणि पक्ष कार्यकर्त्यांना अधिक वेळ द्या, अशी ताकीद भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यावर आता दररोज एक मंत्री भाजप कार्यालयात दुपारी दोन ते पाच या वेळेत बसून जनतेचे प्रश्न सोडविणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविल्याचा फायदा भाजपला मिळून पुढील निवडणुकांमध्ये त्याचा पक्षाला लाभ होणार आहे.
सध्या मंत्र्यांकडे मंत्र्यालयातील कार्यालयात आणि निवासस्थानी जनतेची खूप गर्दी असते. त्यामुळे जनतेसाठी नीट वेळ दिला जात नाही. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते कोणतीही कामे घेऊन आले की, त्यांना वेळ देता येत नाही, अशी तक्रार होती.  आता प्रदेश कार्यालयात दररोज एक मंत्री उपस्थित राहतील. यामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश राहणार आहे. भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडे त्याचे वेळापत्रक पाठवून तेथील पदाधिकाऱ्यांमार्फत मंत्र्यांकडे कामे पाठविली जावीत, अशी व्यवस्था केली जाणार आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या कामांचे काय झाले, याचा पाठपुरावा या स्वीय सहाय्यकाकडून वेळोवेळी घेतला जाणार आहे. ज्या जिल्ह्य़ात शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्य़ात भाजपचे संपर्क मंत्री नेमले जातील, असे संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी सांगितले.