राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांचे गाण्यांचे अल्बम्स रिलीज होण्याआधीच चर्चेचा विषय ठरतात. शिवाय त्यांनी केलेली राजकीय टोलेबाजीही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमृता फडणवीस यांनी घेतलेले उखाणेही व्हायरल झाल्याचं दिसून आलं आहे. नुकतीच त्यांनी नागपुरातील एका जाहीर हळदी-कुंकू कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा दिसून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस आणि विकासाचं वाण!

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षांकडून केली जाते. त्याला विरोधी पक्षांकडूनही तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर दिलं जातं. एकीकडे महाविकास आघाडीतील जागावाटप आणि दुसरीकडे मराठा आरक्षणावरून सत्ताधारी मित्रपक्षांमधल्याच छगन भुजबळांनी घेतलेली वेगळी भूमिका या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन्ही बाजूला अंतर्गत सुंदोपसुंदी निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर केल्या जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा केली जात आहे.

“कुछ लोग जो ज्यादा जानते है इन्सान को कम पहचानते हैं..”, अमृता फडणवीसांनी पोस्ट केला गाण्याचा व्हिडीओ

अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमात उखाणा घेताना सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र निर्माणाचं काम करण्याचं आवाहन केलं. “ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण, त्या देवेंद्रजींकडून मी घेऊन आले आहे विकासाचं वाण, आपण सगळे एकत्र करू महाराष्ट्र निर्माण”, असा उखाणा त्यांनी घेतला.

गेल्या वर्षीचा उखाणाही चर्चेत!

दरम्यान, गेल्या वर्षी नवरात्रौत्सवादरम्यान एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी घेतलेला उखाणा अशाच प्रकारे चर्चेत आला होता. “मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात, देवेंद्रसारखे रत्न, पडले माझ्या गळ्यात”, असा उखाणा त्यांनी घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis ukhana in nagpur viral mocking uddhav thackeray pmw
First published on: 06-02-2024 at 08:56 IST