नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. चांगल्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बदल्या होणे म्हणजे समाज, शहर व राज्याचे नुकसान असल्याचे हजारे यांनी सांगितले.

या अधिकाऱ्यांनी बदलीस न घाबरता काम करताना नियमात राहून काम करण्याची तयारी ठेवली तर जे ७२ वर्षांत घडले नाही ते केवळ १० वर्षांत होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगले काम करताना असे अधिकारी समाज व देशाचा विचार करतात, मात्र काही लोकांना हेच आवडत नाही. म्हणूनच चांगल्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. वारंवार बदल्यांविरोधात आपण २००३ मध्ये आझाद मैदानावर आंदोलन करून सरकारकडून बदल्यांचा कायदा संमत करून घेतला होता. त्यामुळे ३ वर्षे होण्याअगोदर बदली होणे चुकीचे आहे. वारंवार बदल्यांमुळे अधिकाऱ्यांची चांगले काम करण्याबद्दल उदासीनता तयार झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही हजारे यांनी उपस्थित केला. दबावातून झालेली मुंढे यांची बदली ही दुर्दैवी बाब असून त्याचे आपणास वाईट वाटल्याची टिप्पणीही त्यांनी केली.