“मी सामान्य जनतेच्या पाठबळावर आतापर्यंत सरकारला आठ कायदे करायला भाग पाडले. त्यामुळे जनतेच्या कामांसाठी राजकारणातच असले पाहिजे हा समज चुकीचा आहे. केंद्रीय मंत्र्यालाही एकट्याने मागणी करून एखादा कायदा करणे शक्‍य नसते. मात्र, कोणत्याही पदावर नसताना मला ते शक्य झाले. त्यामुळे “मी जर राजकारणात आलो आणि निवडणूक लढवली, तर माझी अनामत रक्कम जप्त होईल,” असे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी म्हटले आहे. यावरुन राजकारणात येण्याबाबत उत्सुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेले लष्करी अधिकारी व जवानांनी सहकुटुंब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली, वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात चांगले काम होण्यासाठी केवळ राजकारणाची आवश्यकता नाही, उलट राजकारणापेक्षा जनसंघटन महत्त्वाचे असून तेच काम मी करीत आहे. त्यामुळे मला जनतेचे प्रश्न सोडविण्यात यश आले. मात्र, असे असले तरी आपल्या देशातील मतदार अद्याप जागृत झालेले नाहीत. ते सर्रास राजकीय पक्षांच्या भूलथापा आणि आमिषांना बळी पडतात. आपल्याकडे निवडणुका या पक्ष व चिन्हांच्या आधारे होत असल्याने बहुमतात येणाऱ्या पक्षाचीच चलती राहते. इतरांना फारसे महत्वच दिले जात नाही त्यामुळे देशात पक्ष व चिन्हविरहित निवडणुका होतील त्याचवेळी खरी लोकशाही अस्तित्वात येईल.”

“अरविंद केजरीवाल यांना आता पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. माझ्यासोबत राहून त्यांना हे स्वप्न पूर्ण करायचे होते. मात्र, आता ते शक्‍य होणार नाही. कारण त्यांच्या कारभारात झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक फायली माझ्यापर्यंत आल्या आहेत,” अशा शब्दांत हजारे यांनी केजरीवालांवर टीका केली.