प्रेमी युगुलास मारहाण करताना त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करून व्हॉट्सअपवर ते टाकून युगुलाची बदनामी करणाऱ्या ‘गनिमी कावा’ संघटनेच्या आरोपींविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येईल का, याची पोलीसांनी माहिती घ्यावी, असे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. तरुणांनी प्रेमी युगुलास केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ वकिलांना दाखविण्यात यावा आणि त्यांचे मत जाणून घेऊन गरज पडल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
लातूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एका प्रेमी युगुलास स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याचे चित्रण व्हॉट्सअपवर टाकले. ते एका दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होताच राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर ही चित्रफीत नेमकी कुठली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आणि हा प्रकार लातूर जिल्हय़ातील असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीसांनी गनिमी कावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे, संदीप गोडसे, अमोल खंदारे व नितीन गोडसे यांना अटक केली. हे सर्व साखरा, तालुका लातूर येथील आहेत.
३० नोव्हेंबर २०१४ ला लातूर-मुरूड रस्त्यावर साखरा पाटी ते अंकोली दरम्यान प्रेमी युगुलास सायंकाळच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यातील मुलीला पालकाच्या स्वाधीन करून संघटनेचे कार्यकत्रे निघून गेले. मात्र, व्हॉट्सअपमुळे या प्रकाराची चर्चा पसरली. आणखी किती युगुलांबाबत असे प्रकार घडले असावेत, याचाही तपास पोलीस करीत आहेत.