औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती विमा झाला होता. या कर्मचाऱ्याचे वेतन अॅक्सिस बँकेतून होत असत. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना बँकेने उतरवलेल्या मोफत अपघाती विम्या अंतर्गत ३० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. मृत कर्मचाऱ्याचे नाव अनिल शिंदे असून ते स्पेशल प्रोटेक्शन फोर्समध्ये तैनात होते. शिंदे यांच्या पत्नीला गुरुवारी पोलीस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या हस्ते ३० लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गत ६ जून रोजी पडेगाव टोलनाक्याजवळ अनिल शिंदे यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. यात शिंदे यांचा मृत्यू झाला. दरम्यान अॅक्सिस बॅंकेच्या मोफत अपघाती विमा योजनेची माहिती दिवंगत शिंदे यांच्या पत्नी सुनीता शिंदे यांना माहिती मिळाल्यामुळे त्यांनी बॅंकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या हस्ते ३० लाखांचा धनादेश सुनीता शिंदे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बॅंकेचे विभागीय प्रमुख नितीन चालसे सहाय्यक पोलीस निरीक्षक घन्नशाम सोनवणे, पोलीस कर्मचारी अविनाश जोशी, बॅंकेचे सुदर्शन कोलते, मनोज कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.