सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गावर भले मोठे खड्डे पडले असून ते चुकविण्याच्या नादात वाहन अपघात किंवा जीव गमाविण्याची पाळी आली आहे. हायवेवर काही ठिकाणी गावातील पाणंद तरी चांगली असते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्यात खासदार विनायक राऊत यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे डांबराने भरण्याचे निर्देश दिले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंधुदुर्गमधील मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे. रस्त्यावरून वाहने खड्डे चुकविण्याची स्पर्धा करतात, पण त्यात अपघात होऊन जीव गमाविण्याची पाळी आली आहे.

कणकवलीत एका अपघातात तलाठी आणि विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याआधीही कुडाळच्या हायवेवर मोटारसायकलवरून कुटुंब जात असताना त्यातील लहान मुलाला मागे घेऊन बसलेली आई मुलासह खाली पडली. यात मूल जिवंत राहिले, पण आईला जीव गमवावा लागला. अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील महामार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डय़ांनी रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर मारलेला डांबरीकरणाचा सीलकोटचा थर गायब झाल्याचे दिसत असून हा सरळमार्गी निकृष्ट दर्जादेखील दिसत आहे.

खारेपाटण ते पत्रादेवी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. झाराप ते पत्रादेवी या चौपदरी मार्गावरदेखील बांधकाम खात्याचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्याचा उंचसखलपणा वाहनधारकांना त्रस्त करणारा आहे.