शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पूर्व विदर्भात आधीच कमजोर असलेल्या शिवसेनेचा जनाधार आणखी घटण्याचीच शक्यता अधिक आहे. आजवर मिळत आलेले अपवादात्मक विजय भविष्यात मिळतील की नाही याविषयी खुद्द शिवसैनिकच साशंक आहेत.
शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार करणे सुरू केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी या पक्षाची बांधणी सुरू झाली. विदर्भही त्याला अपवाद नव्हता. रिडल्सच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या जातीय तणावाचा फायदा घेत हा पक्ष पूर्व विदर्भातील अनेक जिल्हय़ात युवकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यामागे खुद्द ठाकरे यांचे परिश्रम होते. त्यांच्या तेव्हाच्या दौऱ्यामुळे पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती झाली. दुर्दैवाने याच पक्षातील दुसऱ्या फळीचे नेते या अनुकूल वातावरणाचा लाभ मिळवू शकले नाही. त्यामुळे या पक्षाचा जनाधार लक्षणीय म्हणावा असा कधी वाढला नाही. १९९० च्या दशकात विदर्भातील अकोला व चंद्रपूर या दोन जिल्हय़ात पक्षाचे काम अतिशय उत्तम आहे असे खुद्द ठाकरे प्रत्येक बैठकीत सांगायचे. आज मात्र वेगळीच स्थिती आहे. १९८९ ते १९९५ या काळात ठाकरेंनी विदर्भात केलेल्या दौऱ्यानंतर पक्षाच्या आमदारांची संख्या वाढली. १९९० च्या निवडणुकीत या पक्षाने ब्रम्हपुरी व आरमोरीची जागा जिंकली. शिवाय इतर तीन ठिकाणी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. हे यशाचे सातत्य नंतर पक्षाचे इतर नेते अबाधित राखू शकले नाहीत.
नागपूरमधील रामटेक, वध्र्यातील हिंगणघाट, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीतील आरमोरी या जागांवर पक्षाला आजवर यश मिळत आले. नंतर हे यश त्या त्या आमदाराच्या वैयक्तिक खात्यात जमा होऊ लागले. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात हा पक्ष नेहमी कमजोर राहिला. ९० च्या दशकात शिवसेनेचा बोलबाला जास्त होता व त्यांच्यासोबत युतीत असलेल्या भाजपचा कमी. नंतर परिस्थिती झपाटय़ाने बदलली.
भाजपने पद्धतशीरपणे सेनेचे खच्चीकरण केले असा आरोप शिवसैनिक नेहमी करतात. त्यात तथ्यही आहे. या खच्चीकरणाकडे मुंबईत बसून संपर्क प्रमुखाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सेनेच्या नेत्यांनी अजिबात लक्ष दिले नाही.
त्यामुळे सेनेचा जनाधार कायम घटत  राहिला. प्रत्येक निवडणुकीत मतांच्या विभाजनाचा फायदा घेत काही आमदार निवडून येत गेले व सेनेचे नेतृत्व त्यावरच समाधान मानत राहिले. आता ठाकरेंच्या निधनानंतर सेनेचा जादुई करिष्मा संपलेला आहे.
नेहमी आक्रमक राहणाऱ्या शिवसैनिकांना ज्वालाग्रही विचाराचेच नेतृत्व हवे, आताचे नेतृत्व मवाळ आहे. त्यामुळे भविष्यात सेनेला यश मिळण्याची शक्यता आणखी धूसर झाली असल्याचे सेनेचेच माजी पदाधिकारी स्पष्टपणे बोलून दाखवतात. स्थानिक संस्थांमध्ये हा पक्ष अनेक ठिकाणी आताच एक आकडी संख्येवर आला आहे. आता ठाकरेंचाच आवाज संपल्याने त्यात आणखी घट होण्याची शक्यता अधिक आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे अनेक शिवसैनिकांची पावले आता मनसेकडे वळण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे.