scorecardresearch

आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख; त्वरीत कारवाईची मागणी

आठवीच्या पुस्तकात क्रांतिकारी सुखदेव यांचा अपमान केल्याने संताप

आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख; त्वरीत कारवाईची मागणी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करलं हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात सुखेदव  यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात करण्यात आलेली ही चूक अक्षम्य असल्याचं ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी म्हटलं आहे. ब्राह्मण महासंघाने हा मुद्दा उपस्थित केला असून हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान असल्याचा संताप व्यक्त केला आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यात व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचालेल्या प्रश्नात हा उल्लेख आहे.

काय आहे वाक्य ?
“भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”.

दरम्यान धड्याच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातून हा धडा घेण्यात आला आहे. पुस्तकालील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या धड्यातून उलगडण्यात आला आहे.

पुस्तकाची पीडीएफ लिंक – https://fliphtml5.com/aodjm/xrja/basic

ब्राह्मण महासंघाने या चुकीकडे लक्ष वेधलं असून संताप व्यक्त केला आहे. ब्राह्मण महासंघाने महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून एवढी गाढव चूक अपेक्षित नाही अशी टीका करताना ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

बालभारतीचं स्पष्टीकरण-
“लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील लेख जसाच्या तसा आठवीच्या भाषेच्या पाठ्यपुस्तकात वापरण्यात आला आहे. त्यांच्या पुस्तकातील मुळ मांडणीच तशी आहे. आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा उल्लेख आहे. त्यांच्यासारखेच कुर्बान हुसेन हे सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सोलापूरमध्ये त्या काळी वृत्तपत्र सुरू केले होते. भाषेच्या पुस्तकातील या उल्लेखाच्या संदर्भातील अधिक तपशील, पुरावे मिळवण्यात येत आहेत,” अशी माहिती बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.

कोण होते कुर्बान हुसेन?
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी देशासाठी हौतात्म्य स्विकारलं त्याच वेळी म्हणजे १९३१ मध्ये अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून फासावर चढवलं होतं. १२ जानेवारी १९३१ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर  येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांचं वय अवघे २२ वर्षे होतं. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

अब्दुल कुर्बान हुसेन यांच्यासोबत सोलापूरचे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे तरुणदेखील फासावर चढले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटलं जातं. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’मध्ये आढळतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-07-2020 at 12:06 IST

संबंधित बातम्या