मराठवडय़ामधील पदवीधरांचा धक्कादायक कल; अभियांत्रिकी क्षेत्राकडून रोजगार भरवसा आटला

औरंगाबाद : चार अभियंते. हृषीकेश लहाने, सागर काकडे, आकाश पवनकर आणि प्रियंका बडदाळे अशी त्यांची नावे. त्यातील प्रियंका तर अभियांत्रिकीतील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण. चौघांचाही गुणांचा आलेखही चांगला. तरीही हे चौघेही सध्या अभियंता म्हणून काम करण्यास उत्सुक नाहीत. त्यांना हवी आहे बँकेत नोकरी. अगदी कारकुनाचीसुद्धा चालेल. अन् त्यासाठी त्यांनी खासगी शिकवणीवर्गात प्रवेश घेतला आहे.

एके काळी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असलेल्या अभियांत्रिकी क्षेत्राचे आकर्षण गेल्या काही वर्षांमध्ये घसरत चालले आहे. चांगला रोजगार मिळवून देण्यात अपयशी ठरत असल्याने या क्षेत्रातील अनेक पदवीधर निराश आणि हताश बनत चालले आहेत. राज्यातील ३५० अभियांत्रिकी महाविद्यालयात एक लाख ३९ हजार ९८३ जागांपैकी ५० टक्क्यांहून अधिक जागा या वर्षी रिक्त राहणार आहेत. गेल्या वर्षी हा आकडा ८० हजारांच्या घरात होता.

अभियांत्रिकी हे क्षेत्र उत्पादकतेशी निगडित असे जर कोणी म्हणत असेल तर त्याला चूक ठरवता येईल, एवढा हा आलेख बदलणारा असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. औरंगाबाद येथे बँकेच्या क्षेत्रातील परीक्षांसाठी खासगी शिकवणी वर्ग घेणारे संचालक अभिषेक गायके यांनी सांगितले, की २००८-२००९ पासून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी बँकेच्या परीक्षा द्यायला लागले. आता परिस्थिती अशी आहे की, प्रवेश घेणारे ६० टक्के विद्यार्थी अभियंते आहेत. उत्पादन क्षेत्रात संधी नसल्याने अभियंते आता सेवा क्षेत्रातील संधी शोधू लागले आहेत.

हृषीकेश लहाने औरंगाबादच्या चिकलठाणा भागात राहतो. २०१७ मध्ये त्याने यांत्रिकी शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शेवटच्या वर्षांला त्याला ६७ टक्के गुण होते. वडील कंपनीत कामगार आणि आई गृहिणी. नोकरीसाठी त्याने प्रयत्न केले. पण ज्या खासगी कंपनीत अर्ज केला तेथे वेतनाची रक्कम होती १५ हजार रुपये. तो म्हणाला, त्यापेक्षा बँकेतील कारकुनाला अधिक पगार असतो. २५ हजार रुपये मिळतात. थोडासा अभ्यास केला तर ही परीक्षा अभियंत्यांना देणे सोपे असते. प्रियंका बडदाळे अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर बंगळुरूमध्ये अर्ज केला होता. तेव्हा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मंदीचे सावट होते. कंपनीने पगार सांगितला १५ हजार रुपये. विवाह झाला होता. एका ठिकाणी पती आणि दुसऱ्या ठिकाणी स्वत: अशी नोकरी करणे शक्य नव्हते आणि १५ हजार रुपयांत भागवायचे कसे, असा प्रश्न होता. त्यांनी बँकेच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि खासगी शिकवणी वर्गात प्रवेश केला. ‘बँकेची परीक्षा देण्यासाठी दहावीपर्यंतचे गणित उपयोगी पडते. तेव्हा ते गणित पायरी पायरीने सोडवावे लागे. आता बँकेच्या परीक्षेत तेच गणित झटपट सोडवावे लागते. तेवढा सराव झाला की, ही परीक्षा सोपी असते. कामाचा ताणही कमी असतो. विशेषत: बँकेतील कारकून पदावरील कर्मचाऱ्यांना दहा ते पाच एवढय़ा वेळेतच काम करावे लागते. त्यामुळे ताण कमी असतो.’

सागर काकडेही पुण्यात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेला. त्याचा कल मात्र इन्शुरन्स कंपन्यांमधील नोकऱ्यांकडे. तो सांगत होता, ‘बँक आणि इन्शुरन्स या दोन क्षेत्रांत थोडय़ाशा अभ्यासानंतर आम्ही उत्तीर्ण होऊ शकतो.’ हृषीकेश लहाने, सागर काकडे, प्रियंका बडदाळे हे उमेदवार अभियांत्रिकी सोडून बँकिंग क्षेत्रात उतरणारी निवडक उदाहरणे आहेत. बहुतांश बँकांमध्ये सध्या अभियंत्यांचाच भरणा असल्याचे सांगण्यात येते. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे देवीदास तुळजापूरकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांत बँकांमधील रिक्त पदांवरील झालेल्या भरतीमध्ये निवड झालेले ९० टक्के उमेदवार हे अभियंते आहेत.

काय होतेय?

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या दहा-पंधरा हजार रुपयांच्या तुटपुंज्या पगारात राबण्याऐवजी सरकारी नोकरीत थोडा अधिकच पगार आणि सुविधांसह सुरक्षा या कारणांमुळे अनेक तरुण सध्या बँक परीक्षेच्या तयारीत गुंतले आहेत. बँक परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवणी वर्गात ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. बँक क्षेत्रातील गेल्या तीन वर्षांत निवड झालेले बहुतांश उमेदवार हे अभियंते आहेत. राज्यातील इतर भागांतही हेच चित्र कमी-अधिक प्रमाणात असून अभियांत्रिकीवरचा रोजगार भरवसा आटत चालला आहे.

‘‘उद्योगजगातील वाढ आणि क्षमतांचा विचार न करता देशभर अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली गेली. परिणामी नोकरी आणि पदवीधर यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. गेल्या २० वर्षांत मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, व्हिएतनाम यांनी या क्षेत्रात चांगली भरभराट केली. परिणामी उत्पादकतेमध्ये अधिक कौशल्य निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. ते कौशल्य नसेल तर नोकरी मिळण्यात अडचणी भासू लागली. आकर्षक वेतनाच्या संधी कमी झाल्या असल्या तरी अभियांत्रिकी क्षेत्रात वाढ होण्याची संधी असते. ती बँक किंवा विमा क्षेत्रात तुलनेने कमी असते. पण शिक्षणाचा दर्जा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. पण त्यातील शिक्षणाचा दर्जा जगाशी स्पर्धा करणारा असेल तरच अधिक पगाराची नोकरी मिळू शकेल. सध्या तसे घडताना दिसत नाही. म्हणून अभियंते सेवा क्षेत्राकडे वळत आहेत.

– मुकुंद कु लकर्णी, उद्योजक