पश्चिम रेल्वेवर दुसरे केंद्र

पालघर : पालघर रेल्वे स्थानकावर ‘शिशू स्तन्यपान केंद्र’ उभारल्यानंतर पश्चिम रेल्वेने बोईसर स्थानकात दुसरे ‘शिशू स्तन्यपान केंद्र’ उभारले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना आपल्या बाळांना स्तन्यपान देणे सुलभ होणार आहे.

चाइल्ड हेल्प फाउंडेशन या बालसंगोपनामधील देशव्यापी स्वयंसेवी संस्थेने पश्चिम रेल्वे (मुंबई विभाग) आणि अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड यांच्या सहयोगाने बोईसर रेल्वे स्थानकामध्ये ‘बाळ स्तनपान केंद्रा’ची स्थापना केली. पालघर रेल्वे स्थानकावर यापूर्वी या केंद्राची उभारणी केल्यानंतर बोईसरमध्ये असे केंद्र उभारण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे दुसरे ‘शिशू स्तन्यपान केंद्र’ आहे. पश्चिम रेल्वेचे अधिकारी संदेश चिपळूणकर, अल्केम लॅबोरेटरीजचे महाव्यवस्थापक अल्बर्ट पीटर यांच्यासह चाइल्ड हेल्प फाउंडेशनचे कार्यकारी संचालक जिजी जॉन यांच्या हस्ते या केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून तान्हे बाळ असलेल्या मातांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मातांना प्रवासादरम्यान त्यांच्या बाळांना स्तन्यपान देण्याबाबत सोयीचे होणार आहे, असे जॉन यांनी सांगितले.

बोईसर स्थानकातील फलाट क्रमांक दोन व तीनवर स्तन्यपान केंद्र उभारण्यात आले आहे. मुंबईचे औद्योगिक उपगनर असलेले बोईसर पायाभूत सुविधा आणि निवासी प्रकल्पांसह जलदगतीने निवासी केंद्र बनत आहे. बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील टर्मिनसही आहे. या स्थानकावर उपनगरी गाडय़ांसह लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतात. बोईसरमध्ये वाढती लोकसंख्या, वाढती व्यावसायिक रेलचेल असल्याने स्थानकामध्ये हे केंद्र उभारण्यात आले असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

जागतिक कर्करोग दिनी पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने बोईसर रेल्वे स्थानकामध्ये ‘बाल स्तन्यपान केंद्र’ उभारण्यात आले आहे. स्तनदा मातांना रेल्वे प्रवासात बाळांना स्तन्यपान करणे सुलभ व्हावे यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे. – जिजी जॉन, चाइल्ड हेल्प फाऊंडेशन