महाराष्ट्रात तीन दिवस पुरेल इतकाच करोना लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. यावेळी त्यांनी केंद्राकडून गरज आहे तितक्या वेगाना पुरवठा होत नसल्याचंही म्हटलं. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत करोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं म्हटलं. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी मिळाल्या आहेत सांगत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

“आरोग्यमंत्र्याचं पत्र काल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बं द केलं पाहिजे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला झालेल्या लसींच्या पुरवठ्यासंबंधीची आकडेवारी दिली आहे. टीक करणाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुऱवठा राज्याला करण्यात आला आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी वाचा- पुण्यात १०९ लसीकरण केंद्र बंद, “आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करा”; सुप्रिया सुळेंची केंद्राला विनंती

वाझेंचं पत्र गंभीर
“सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र गंभीर असून त्यात लिहिलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात जे घडत आहे ते राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करायला सांगितलं असून पत्र वैगेरे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याची त्यांनी किंवा संबंधित यंत्रणेने चौकशी करावी. अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर त्यांसदर्भातील चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. नीट चौकशी होऊन सत्या बाहेर आलं पाहिजे. अन्यथ डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखा
“सरकारने रेमडेसिवीरच्या बाबतीत विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काळाबाजार कसा होतो हे आपण आधी पाहिलं असून सध्याही तीच परिस्थिती आहे. दुसरी लाट आहे ती देशातील सर्व राज्यांमध्ये नाही. मागील लाट सगळीकडे होती. त्यामुळे आपल्या राज्यांनी जिथे लाट नाही तेथून रेमडेसिवीर घेता येईल का याकडे लक्ष दिलं पाहिजे. उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांशी चर्चा करुन जास्तीत जास्त पुरवठा कसा होईल आणि काळाबाजार होणार नाही हे पाहिलं पाहिजे. काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती
“मुख्यमंत्र्यांनी लॉकाउनचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांशी चर्चा करायला हवी होती. दोन दिवसांचा लॉकडाउन सांगताना सातही दिवसांचा लॉकडाउन केल्याने फसवल्याची भावना व्यापारी आणि इतरांमध्ये झाली आहे. शेवटी व्यक्तीचं जीवन महत्वाचं आहे पण ते जगण्यासाठी दोन पैसे, खाण्यासाठी काही रिहालं नाही तर या समस्येतून हा उद्रेक झाला आहे. सरकारने या उद्रेकाकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकार आणि समाज एकमेकांसोर उभं राहणं योग्य नाही. समनव्य महत्वाचा आहे. कधी दोन पावलं मागे तर कधी समोर असं करावं लागतं. पण कुठे समजुतीचं वातावरण तयार होताना दिसत नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.