देवरुख पालिकेत राष्ट्रवादी-भाजप युती

देवरुख नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पुढाकाराने भाजपच्या उमेदवारासह तिघांचे अपहरण होऊनही कॉंग्रेस आघाडीच्या मदतीने भाजप उमेदवार नीलेश भुरवणे यांची नगराध्यक्षपदी, तर कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत शेटय़े यांची उपनगराध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. शिवसेनेच्या सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
तीन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची पहिली अडीच वष्रे पूर्ण झाल्यानंतर भाजपने सेनेशी युती तोडत ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत सेनेचे नंदादीप ऊर्फ बंडय़ा बोरुकर यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली. १७ सदस्यांच्या सभागृहात सेनेचे ७, भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ४ तर कॉंग्रेसचा १ सदस्य आहे. आज झालेल्या निवडणुकीसाठी निलेश भुरवणे यांनी भाजपाकडून तर बोरुकर यांनी सेनेतर्फे अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत विजयासाठी भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीशी संधान साधल्याचे लक्षात आल्यानंतर सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह नगर पंचायत सदस्य मनीष सावंत, दादा शिंदे इत्यादींनी भाजपा-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या अपहरणाचा डाव रचला. त्यानुसार नगराध्यक्षपदाचे उमेदवार भुरवणे, उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रफुल्ल भुवड आणि भाजपचे शहराध्यक्ष कुंदन कुलकर्णी यांचे काल मध्यरात्रीनंतर अपहरण करण्यात आले. त्याचबरोबर सेनेचे उमेदवार बोरुकरही सकाळपासून बेपत्ता झाले.
या घडामोडींमुळे नगर पंचायत परिसरासह शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त वाढवला. तसेच सेनेचे सदस्य सावंत आणि शिंदे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. जिल्हा प्रमुख महाडिक यांच्याविरुद्धही अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे सेनेचे उरलेसुरले बळही संपुष्टात आले आणि अपहरण झालेले भुरवणे यांची त्यांच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री कार्यालयातून हस्तक्षेप?
रविवार मध्यरात्रीपासून सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच भाजपा व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पहाटे दोनच्या सुमारास हॉटेलमधून अंगावरच्या वस्त्रांनिशी उचलून नेण्यात आले. त्यासाठी जिल्हाप्रमुख महाडिक यांची गाडी वापरण्यात आली होती. महिला सदस्यांनाही पळवून नेण्याचा प्रयत्न त्यांच्या जोरदार प्रतिकारामुळे फसला, अशा तक्रारी भाजपाच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांकडून थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सकाळीच करण्यात आल्या. त्यामुळे त्या कार्यालयाकडून सेनेच्या संबंधित सदस्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले, अशी माहिती पुढे आली आहे.
सध्या विधानसभा निवडणूक सुरू असलेले बिहार राज्य निवडणुकीतील दंडेलशाही, पळवापळवीसाठी कुप्रसिद्ध आहे. पण देवरुखात सेनेच्या नेते-कार्यकर्त्यांनी त्यांचाच कित्ता गिरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.