केंद्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्य़ात ‘सेंट्रल इंस्टिटय़ूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी (सीपेट) ला मंजुरी दिली आहे. केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून ही मंजुरी मिळाली असून सध्या या केंद्रासाठी जागेचा शोध युध्दपातळीवर घेतला जात आहे.
औरंगाबादनंतर चंद्रपुरातील हे केंद्र राज्यातील दुसरे आणि विदर्भातील पहिलेच केंद्र राहणार आहे, हे विशेष. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रासाठी लवकरच एक जागा निश्चित करण्यात येणार असून साधारणत: दोन ते तीन महिन्यात हे केंद्र सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
‘सीपेट’चे मुख्यालय चेन्नईत असून केंद्र सरकारने १९६८ मध्ये ही संस्था तेथे सुरू केली तेव्हापासून या संस्थेची प्रगती सुरू आहे. ‘सीपेट’चे सध्या देशभरात २३ केंद्रे आहेत. यात अहमदाबाद, अमृतसर, भोपाल, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, हाजीपूर, हलदीया, इंफाल, जयपूर, कोची, लखनऊ, म्हैसूर, पानीपत व औरंगाबादचा समावेश आहे. चंद्रपुरातील हे २४ वे केद्र असेल. विशेष म्हणजे, या केंद्राला केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ मंजुरी देखील प्रदान केली.
आता यासाठी चंद्रपुरात प्रशस्त जागेचा शोध घेतला जात आहे. ही जागा सर्व दृष्टीने अनुकूल असायला हवी, याची विशेष काळजी घेतली जात आहे. वेकोलिच्या वर्कशॉपमध्ये हे केंद्र सुरू करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेकोलिची पद्मापूर, दुर्गापूर व ताडाळी येथील जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, अजून तरी कुठलीही जागा निश्चित झालेली नाही. चंद्रपूर शहरालगत आणखी काही सरकारी जमिनींचीही पाहणी करण्यात येत आहे.
‘सीपेट’ सुरू होतच चंद्रपूर व त्यातल्या त्यात विदर्भातील विद्यार्थी व तरुणांना त्याचा लाभ मिळणार आहे. या केंद्रात चार स्तरीय प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचा यात समावेश आहे. या अभ्यासक्रमांचा कालावधी दीड वष्रे, दोन वष्रे, तीन वष्रे आणि पाच वष्रे आहे.
यासाठी प्रत्येक वर्षी प्रवेश परीक्षा जुलैच्या दुसऱ्या रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. तसेच १३ हजार ७५० ते २२ हजार रुपये फी स्वरूपात घेतले जातात. या केंद्रामुळे विदर्भातील मुलांना प्लास्टिक प्रोसेसिंग, टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग, आर्ट आदि सर्व बाबींचा तांत्रिक अभ्यास शिकविला जाणार आहे. स्कील डेव्हलपमेंट आणि इतर सर्व प्रकारच्या शाखा यात असतील.