राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे येत्या १० जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी छगन भुजबळ यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती. भुजबळ आणि नार्वेकर यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे वृत्तवाहिन्यांवर सांगण्यात आले. भुजबळ-नार्वेकर भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारागृहातून बाहेर आल्यापासून भुजबळ यांनीही शिवसेनेप्रती आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या.

येडियुरप्पांचा अडीच दिवसांचा विक्रम अबाधित राहणार, अजित पवारांचा टोला

दरम्यान, अजित पवारांनी हल्लाबोल यात्रेत भुजबळ सामील होणार असल्याचे जाहीर केल्याने उलटसुलट चर्चांना चाप बसण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर भुजबळ हे कारागृहातून बाहेर आले आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी, त्यांनी अडीच दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा येडियुरप्पांचा विक्रम देशातील कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री किंवा पक्ष मोडू शकणार नाही, असा उपहासात्मक टोला भाजपाला लगावला.