स्वयंसेवी संस्थांचा सरकारला सवाल
बेफिकीर यंत्रणा सुधारण्याची गरज
गेल्या वर्षीपेक्षा मेळघाटात यंदा बालमृत्यूंचे प्रमाण कमी झालेले दिसत असले, तरी ‘कोवळी पानगळ’ अजूनही थांबलेली नाही. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल १२ ते जानेवारी १३ या कालावधीत ३६२ बालकांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांची वानवा, उपकरणांचा तुटवडा अशा समस्या मेळघाटात सातत्याने भेडसावत असताना कुपोषणावरील श्व्ोतपत्रिकेत त्याचे प्रतिबिंब उमटणार काय, हा कळीचा प्रश्न आहे.
एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात ६ वर्षांपर्यंतची ४१९ बालके दगावली. एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१३ या कालावधीत बालमृत्यूची संख्या ३६२ वर पोहचली आहे. तीव्र कुपोषित (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांच्या संख्येत घट झाल्याचे सांगून आरोग्य यंत्रणा आपली पाठ थोपटून घेत असली तरी बालमृत्यू आटोक्यात आलेले नाहीत. जिल्ह्य़ातील गैरआदिवासी भागात याच कालावधीत ३४५ बालमृत्यू झाल्याची नोंद आहे. अमरावती जिल्ह्य़ातील १२ तालुक्यांमध्ये झालेल्या बालमृत्यूंची संख्या आणि मेळघाटातील दोन तालुक्यांमधील बालमृत्यूंची संख्या सारखीच असणे ही अवस्था मेळघाटातील स्थितीचे निदर्शक ठरली आहे.
मेळघाटात १९९६-९७ या वर्षांत तब्बल १ हजार ५१ बालमृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या. नवसंजीवनी योजनेंतर्गत अनेक उपक्रम राबवले गेले, मातृत्व अनुदान योजना, जननी सुरक्षा, माहेर योजना, बाळ कोपरा, अंगणवाडी केंद्रामार्फत पोषण आहार, ग्राम बालविकास केंद्रांमधून उपचार अशी योजनांची जंत्री असूनही आणि त्यावर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही मेळघाटातील स्थिती सुधारलेली नाही. मेळघाटात कुपोषणग्रस्त धारणीत उपजिल्हा रुग्णालय, २ ग्रामीण रुग्णालये, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ९५ उपकेंद्रे, ३४४ अंगणवाडय़ा, २२ भरारी पथके अशी व्यवस्था दिमतीला असताना प्रत्यक्ष सुविधांच्या बाबतीत प्रचंड ओरड आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा, सीरिंज, नीडल्सचा तुटवडा आहे. डॉक्टरांची ६४ पदे आहेत, त्यापैकी बीएएमएस डॉक्टरांची संख्या ४२ आहे. एमबीबीएस झालेले अनेक डॉक्टर्स ‘बॉन्ड’धारी आहेत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञांची कमतरता आहे. नवजात बालकांसाठी आरोग्य केंद्रामध्ये ‘वॉर्मर्स’ उपलब्ध करून देण्यात आले, त्यापैकी पाच-सहा ठिकाणीच ते चालू स्थितीत आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नावाला रुग्णवाहिका आहे, पण बहुतांश नादुरुस्त आहेत. इंधनाची कमतरता तर या रुग्णवाहिकांसाठी नेहमीचीच आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणा ‘सुदृढ’ करण्याकडे होणारे दुर्लक्ष कुपोषित बालकांच्या मुळाशी आले आहे. मेळघाटात भरारी पथकांची संख्या डॉक्टर आणि वाहनांसह वाढवणे, बालरोगतज्ज्ञांची नेमणूक, अंगणवाडी पर्यवेक्षकांसाठी वाहने, हेल्पलाइन, प्रत्येक विभागासोबत समन्वय संवाद अशा अनेक मागण्या स्वयंसेवी संस्थांनी केल्या होत्या.
अलीकडेच वाहने उपलब्ध झाली, पण कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मेळघाटात मृत्यू जास्त का? जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांप्रमाणे मेळघाटातही प्रशासन आहे, आरोग्य यंत्रणा, शासनाच्या योजना आहेत, तरीही मेळघाटात बालमृत्यू जास्त का? असा सवाल मेळघाटात कार्यरत ‘खोज’ या संस्थेचे अ‍ॅड. बंडय़ा साने यांनी केला आहे. मेळघाटातही इतर तालुक्यांप्रमाणेच यंत्रणा राबत असताना आदिवासी बालकांचे होणारे मृत्यू रोखण्यात येणारे अपयश चिंताजनक आहे. मेळघाटात उपजत मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत बंडय़ा साने यांनी व्यक्त केले आहे.