लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : अपक्ष उमेदवाराच्या नावाने अनाधिकृत उमेदवार प्रतिनिधी नियुक्त करण्यात आल्याच्या कारणावरून साखराळे (ता. वाळवा) येथे मतदानावेळी महायुतीचे खा. धैर्यशीन माने समर्थक आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांच्यात जोरदार हाणामारी झाली. पोलीसांनी हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला असला तरी तणाव निर्माण झाला होता.

हातकणंगले मतदार संघातील साखराळे गावी सहा मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी अपक्ष उमेदवार रामचंद्र साळुंखे यांच्या बोगस स्वाक्षरीने दोन प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते. या नियुक्तीला शिवसेनेच्या खा. धैर्यशील माने समर्थक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत हे प्रतिनिधी मतदारांना केंद्रावर चिन्हाचे नाव सांगून मतदानासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप केला. अपक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी असल्याचे दर्शवून ते ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला.

आणखी वाचा-माढ्यात पैसे वाटपावरून मोठा गोंधळ, दोन गटांत मारामारी

यामुळे शिवसेनेचे माने आणि ठाकरे गटाचे सरूडकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांची गचोटी धरत हाणामारीही झाली. पोलीसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला करत जमाव पांगवला. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी गावात बंदोबस्त वाढविला असून मतदान केंद्रावरही अतिरिक्त पोलीस नियुक्त करण्यात आले.

या प्रकरणी केंद्राधिकार्‍यांडे माने समर्थकांनी तक्रारही केली. वरिष्ठ अधिकारी आल्याविना मतदान होउ देणार नाही अशी भूमिका घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत लेखी तक्रार करण्याची सूचना देउन मतदान सुरू ठेवले.बोगस स्वाक्षरीने उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करत असलेल्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी माने समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.