वाडय़ातील वाहनचालकांची व्यथा; इंधन भरण्यासाठी भिवंडीकडे धाव

वाडा तालुक्यात कुठेही सीएनजी पंप नसल्यामुळे तालुक्यातील शेकडो वाहनचालकांना गाडीमध्ये सीएनजी भरण्यासाठी थेट भिवंडी गाठावे लागते. तब्बल ४० किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने वाहनचालकांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वाडा तालुक्यात अनेक वाहने सीएनजीवर चालतात, त्यात रिक्षा मोठय़ा प्रमाणावर आहेत. सरकारने काही गाडय़ा सीएनजीवर सक्तीने केल्या आहेत. तालुक्यात सीएनजी पंप नसल्यामुळे या गाडय़ांना सीएनजी भरण्यासाठी भिवंडी येथे जावे लागते. भिवंडीशिवाय वाडा परिसरात ४० किलोमीटरच्या अंतरावर कुठेही दुसरा सीएनजी पंप नसल्यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होते. भिवंडी येथील पंपावर जाण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास हे अंतर पार करावे लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

पंपावर गर्दी

भिंवडी येथेही सीएनजी गॅसचे पंप कमी असल्याने या ठिकाणीही गॅस भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत असते. या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होते. या वाहतूक कोंडीचा सामना केल्यानंतर सीएनजी पंपावर रांगा लावाव्या लागतात. एक ते दीड तास रांगांमध्ये वेळ जात असल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यातच भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.

सीएनजी पंप वाडा तालुक्यात नसल्याने रिक्षावाल्यांची फारच गैरसोय होत आहे. सीएनजी भरायला पहाटे पाच वाजता उठून भिवंडी येथे जावे लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय व अर्थिक नुकसान होत आहे.  – मालजी वाडू, रिक्षामालक, वाडा.