सध्याच्या करोना संकटकाळात शहरातल्या स्वच्छतेची काळजी वाहण्याचे अत्यंत जोखमीचे काम करणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी तैनात पोलिसांकडून वारंवार दंडुके खाण्याची पाळी येत आहे. आठवडाभरात अशाप्रकारे दहा कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्याच्या प्रसाद खावा लागला असून शुक्रवारी एकाच दिवसात पाच कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

आयेशा नगर भागात नियुक्तीस असलेले शेखर खैरनार हे स्वच्छता कर्मचारी शुक्रवारी दुपारी काम आटोपल्यावर पायी घरी जाण्यास निघाले. वाटेत पोलिसांनी अडवल्यावर त्यांनी ओळख पत्र दाखवले मात्र त्याचा उपयोग झाला नाही. दोघा पोलिसांनी त्यांना हातातील काठीने मारले असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. तसेच, शाहरुख पठाण हे घनकचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचे चालक आहेत. शहरात जमा केलेला कचरा डेपोत टाकून आल्यानंतर महापालिका आवारात गाडी लावून ते दुचाकीने दरेगाव येथे घरी जाण्यासाठी निघाले. वाटेत ओवाडी नाल्याजवळ त्यांना पोलिसांनी अडवले. स्वच्छता कर्मचारी असल्याचे सांगत त्यांनी ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करून  मारहाण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याचबरोबर शहरातील मोतीबाग नाका, राम सेतु पुल या भागातही स्वच्छता कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून असाच काठीचा प्रसाद खावा लागला असल्याचे सांगण्यात आलेआहे. कॅम्पातील मोची कॉर्नर भागात दुचाकीवरुन जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक पोलिसांनी दोनशे रुपयांचा दंड वसूल केला. तर अत्यावश्यक सेवेचे कर्तव्य बजावत असताना अशाप्रकारे पोलिसांकडून मार खावा लागत असल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठकीसाठी आलेल्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला.