रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी अलिबाग तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्डय़ातील चिखल भेट देऊन निषेध केला.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणारे ठेकेदार आणि अधिकारी यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. अलिबाग शहरानजीकच्या चेंढरे बायपास रस्त्यावर निषेध आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकत्रे यांनी रस्ते बनविणाऱ्यांचा जाहीर निषेध केला.

त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन, निषेधाचा फलक आणि रस्त्यावरील खड्डय़ातील चिखल भेट देण्यात आल्याने गणपती सणापर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते खड्ड्मुक्त करावेत. रस्त्यावर चिखल होईल अशाने खड्डे भरू नयेत. ज्यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ते केले आहेत त्यांना काळ्या यादीत टाकावे. या प्रमुख मागण्या मनसेने केल्या आहेत. मनसेच्या या आंदोलनामध्ये पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष अर्जुन पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष महेश कुन्नुमल, महिला आघाडी सचिव आश्विनी कंटक, नितीन ढेपे, अनिल कंटक, सारज भोईर, नितीन चेवले, कौस्तुभ पाटील, मनोज वाडेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकत्रे सहभागी झाले होते.