||दिगंबर शिंदे
सांगली जिल्ह्यात वाळवा आणि मिरजमध्ये परिस्थिती चिंताजनक
सांगली :  सांगली जिल्ह्यामध्ये करोना रुग्णवाढीमागे नियम पालनाबाबत लोकांची अनास्था आणि राजकीय कार्यक्रमांसाठी होत असलेली गर्दी ही मुख्य कारणे दिसत आहेत. गृह विलगीकरणाचा पर्याय असल्यान रुग्णांचा वावर सार्वजनिक ठिकाणी होत असल्याने याचेही परिणाम रुग्णवाढीवर दिसत आहे. दंडात्मक कारवाई, गुन्हे दाखल करूनही राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची बेफिकीर वृत्तीही याला कारणीभूत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ वाळवा, मिरज या दोन तालुक्यांतच दिसते.

जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३० टक्क्यांवर  पोहोचले होते. जून महिन्यात हे प्रमाण कमी झाले असले तरी ८ ते १२ टक्क्यांवर स्थिरावले आहे. रोजची रुग्णवाढ हजाराच्या घरात असली तरी चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. रोज ११ हजार करोना चाचण्या केल्या जात आहेत.

नागरिकांची अनास्था

एप्रिल, मे महिन्यामध्ये रुग्णवाढीचे प्रमाण शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक होते यामागे समारंभात एकत्र येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला संख्येची मर्यादा असली तरी नियमाचे पालन अभावानेच झाल्याचे दिसत होते. करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर भेटीसाठी जाणे हा भावनिक मुद्दा असल्याने प्रशासनाकडूनही डोळेझाक केली गेली. यामुळेही रुग्णवाढ रोखण्यात फारसे यश येत नाही.

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यात प्रचार, भेटीगाठी यामुळेही या तीन तालुक्यांत रुग्ण वाढत आहेत. महापालिका क्षेत्रात तर निर्बंधांचे पालन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी देखरेख करणाऱ्या यंत्रणाच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

जिल्हयात दुसऱ्या लाटेमध्ये मार्चमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण १२.६९ टक्के होते, हेच प्रमाण एप्रिलमध्ये  २८.३१ टक्के, तर मेमध्ये १५.०९ तर जूनमध्ये ७.३१ टक्के होते. जुलै महिन्यामध्ये यामध्ये पुन्हा वाढ झाली असून गेल्या २० दिवसांतील सरासरी रुग्णवाढ १० ते १२ टक्के झाली आहे.

रुग्णवाढ गेली तीन आठवडे स्थिर असली तरी रोज हजाराने रुग्ण वाढत असल्याने यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. काही करोना उपचार केंद्रे बंद केल्याने उपलब्ध रुग्णालयावर ताण येत असून प्राणवायूयुक्त खाटांसाठी आताच धावपळ करावी लागत असून अद्याप दुसरी लाटच  अटोक्यात आलेली नसताना तिसऱ्या लाटेवेळी पुन्हा भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर आलेल्या राज्य कृती दलाच्या सदस्यांनीही नियम पालनांकडे होत असलेले दुर्लक्ष अधोेरेखित केले आहे.

जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेकडे एका दिवसामध्ये ४५ हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र लसमात्रांचा अपुरा पुरवठा हीच खरी अडचण आहे. २० जुलैअखेर ४५ वर्षांवरील ६१.४८ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असून १८ ते ४५ वयोगटातील केवळ ९.३३ टक्के लोकांनाच लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आतापर्यंत १० लाख ३६ हजार ९३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जर दिवसाआड ५० हजार लसमात्रा उपलब्ध झाल्या तर एक महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे. – डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी

गर्दीच्या ठिकाणी जागेवर करोना चाचण्या, सहवासिता शोधमोहीम गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. याचे परिणाम दिसून येत असून महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांवर आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा लोकांची गर्दी होणार नाही यावरच प्रशासनाचा भर आहे.  – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

पश्चिम महाराष्ट्रामध्ये करोनाची दुसरी लाट विलंबाने सुरू झाली. रोज १३ ते १५ हजारांपर्यंत करोना चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णसंख्या मोठी दिसत असली तरी पॉझिटिव्हिटी दर साडेसात टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शेतीची कामे सुरू झाल्यानेही लोकांचा संपर्क अधिक वाढला आहे. करोना नियमांचे पालन लोकांनी केले तर येत्या आठ-दहा दिवसांमध्ये रुग्णवाढीची गती रोखणे शक्य आहे. – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी