|| विजय राऊत

दिवाळीत झालेल्या गर्दीमुळे बाजारपेठ सात दिवस बंद करण्याची मागणी

कासा : जव्हार तालुक्यात मागील ४५ दिवसांपासून करोनचा संसर्ग कमी झाला आहे. असे असले तरी डिसेंबर महिन्यात दुसरी लाट येण्याची जी शक्यता वर्तविण्यात येत आहे त्याचा  सामना करण्यासाठी  तालुका व नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे, तर दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेली गर्दी आणि त्यात नियमांचे झालेले उल्लंघन पाहता  संसर्ग वाढू नये म्हणून पुन्हा किमान सात दिवस बाजारपेठ बंद करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गणेशोत्सवानंतर तालुक्यात करोना रुग्णांत वाढ झाली होती, अगदी तशीच परिस्थिती दिवाळीनंतर उद्भवणार की काय अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार तालुका व नगर परिषद प्रशासनाने योग्य ती तयारी सुरू केली आहे. जव्हार तालुक्यात यापूर्वी जी रुग्णालये सुरू आहेत ती सर्व रुग्णालये सुरूच ठेवण्यात आलेली आहेत, रुग्णसंख्या वाढल्यास औषधांचा १५ दिवसांचा साठा ठेवण्याच्या सूचना असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. गेल्या २५ दिवसांमध्ये चाचण्याही कमी झाल्या आहेत, त्यामुळे साहजिक रुग्णसंख्येत घट झाली असल्याची माहित देण्यात येते.

डिसेंबरपश्चात करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासाठी तालुक्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सप्टेंबरमध्ये जी आरोग्य यंत्रणा होती तीच कायम आहे.

–  डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी जव्हार