पुण्यातील कल्याणीनगर येथे पॉर्श कारच्या गाडीखाली दोन तरुणांचा बळी गेला. या गाडीचा चालक अल्पवयीन मुलगा असून त्याच्या वडिलांना संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुणेकरांकडून केला जातोय. तसंच, स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव घेतलं जातंय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे. दोन निष्पाप तरुणांचे बळी गेले आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजुरडा, दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डरचा मुलगा आहे. जो दारू पिताना बारमध्ये दिसतोय. तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय? कोणी केलंय हे सगळं?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> “…म्हणून भाजपाकडून शेवटचा डाव टाकण्यात आला”, मुंबईतील मतदान प्रक्रियेवर राऊतांचा आरोप; म्हणाले, “मोदींचं डिजिटल इंडिया…”

“भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक तितकाच भ्रष्ट आमदार. पुण्यातील लोकांनी पोलीस आयुक्तांसमोर जाऊन आंदोलन केलं पाहिजे. काय चाललंय हे. आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत. २५ वर्षांचे एक जोडपं एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजुरडेपणामुळे रस्त्यावर तडफडून मेले आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत? हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार. हे माणुसकी शुन्य लोक आहेत. पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर खायला घालताय. खोटा मेडिकल रिपोर्ट देत आहात, त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे आयुक्त पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहेत”, अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली.

हेही वाचा >> पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव? सुनील टिंगरे यांनी संपूर्ण घटनाक्रमच मांडला!

“पुणे पोलिसांनी दो आँखे बारा हाथ सिनेमा सुरू केला आहे. हा सर्व पैशांचा खेळ आहे. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार पोलिस आणि न्यायालयाने केला आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल, वडिलांना अटक

याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने सोमवारी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून त्याचे वडील फरार होते. पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरू होता. यादरम्यान आज पहाटे त्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली. याशिवाय बार मालक आणि मॅनेजरलाही अटक करण्यात आली. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असतानाही त्यांनी त्याला मद्य दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corrupt police system and equally corrupt mlas sanjay rauts criticism of the pune porsch accident case sgk
Show comments