सेलू तालुक्यातील रायपूर येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धोंडीराम यादवराव गाडेकर (वय ४३) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर देना बँकेचे तीन लाख रुपयांचे कर्ज होते.

धोंडीराम गाडेकर यांना अडीच एकर शेती आहे. सततची नापिकीमुळे ते चिंतेत असायचे. त्यांच्यावर देना बँक शाखेचे तीन लाख रुपयांचे पीककर्ज, महिंद्रा फायनान्स कंपनीचे एक लाख रुपये कर्ज व इतर कर्ज  परतफेड कशी करावी, या चिंतेत ते असायचे. यातूनच त्यांनी आपल्या शेतातील बोरीच्या झाडास गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रायपूर येथे मृत गाडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मृत गाडेकर यांच्या मुलीचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.