वन्यप्राण्यांच्या जीवावर उदार होणाऱ्या वाहनांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी उचललेले पाऊल वनखात्यालाही लाजवणारे आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा हा ‘फाम्र्युला’ राज्याच्या वनखात्याने अंमलात आणल्यास वाहनांच्या धडकेने बळी जाणाऱ्या वन्यप्राण्यांचे जीव वाचवता येणार आहेत. गेल्या काही वर्षांत जंगलालगतच्या रस्त्यांवर वाहनाच्या धडकेने मृत्यू पावणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे.
अजिंठा पर्वतरांगात वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव राज्यमार्ग क्रमांक २४ वरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास व जिवास धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत या रस्त्यावर वाहनांच्या धडकेने अस्वल, रानमांजर, माकड, बिबटे, तसेच इतर वन्यप्राणी रात्री आणि पहाटेच्या वेळी ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापुढेही जैवविविधतेतील महत्त्वाचे प्राणी आणि पक्षीसुद्धा वाहनांच्या धडकेत ठार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-बोथा-खामगाव या राज्य महामार्गावरील वाहतूक रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे. या राज्य महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर, वळणावर गतिरोधक किंवा कठडे लावण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. या रात्रीच्या कालावधीत खामगावकडे जाणारी व खामगावकडून येणारी वाहतूक बुलडाणा-वरवंड-उंद्री-खामगाव, बुलडाणा-मोताळा-नांदुरा-खामगाव आणि बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगाव राजा-खामगाव या पर्यायी मार्गानी वळवण्यात आली आहे. मात्र, रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीसाठी वाहतूक नेहमीप्रमाणे राहील. अभयाण्यातून जाताना वाहनांची वेग मर्यादा ताशी २५ किलोमीटर ठेवण्यात आली आहे. वाहतूक बंद ठेवण्याची व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी अकोला वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षकांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वनखात्याला हे अधिकार असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी वन्यजीवांच्या सुरक्षितेसाठी असे आदेश काढणे हे वनखात्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.
राज्यातील सुमारे सर्वच अभयारण्याला लागून राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातही हरिसालजवळून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हरिसाल गेटजवळ रात्रीच्या वेळी दोन तासांसाठी वाहतूक थांबवून ठेवण्यात येत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचा प्रश्न अजूनही सुटायला तयार नाही. अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येथेही लागू केल्यास हा प्रश्नही सुटू शकतो. धारणी, मेळघाट, पेंच येथून रात्रभर वाहतूक सुरू असते. स्थानिकांना विश्वासात घेतले तर येथील वाहतुकही रात्री बंद ठेवून किंवा रात्री ती मार्ग बदलवून वन्यप्राण्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच्या रस्त्यावर वाहनांच्या धडकेने वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटना अधिक आहेत. वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीची वेळ अंधार पडल्यानंतरची असल्याने अकोला जिल्हाधिकाऱ्यांची हा ‘फाम्र्युला’ राज्याच्या वनखात्याने राबवण्याची गरज आहे.