लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते’, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आता प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात लाट पाहायला मिळत आहे. विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा झाल्या. लोकांमध्ये सकारात्मकता दिसत आहे. विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. मागच्यावेळी चंद्रपूरची जागा आम्ही हरलो होतो. पण यावेळी चंद्रपूरदेखील आम्ही जिंकणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ऐकण्यासाठी लोकांमध्ये उत्कंठा पाहायला मिळते. नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही सभांना अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी होती. तीन-तीन तास लोक सभा ऐकतात, याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांच्याबाबत लोकांना जिव्हाळा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेसमध्येही जागावाटपावर नाराजी; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “आमची अपेक्षा होती की किमान…”

प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?

‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते’, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले. यावर फडणवीस म्हणाले, “मी आता या निवडणुकीत त्यावर काही बोलणार नाही. आधीदेखील या विषयासंदर्भात मी बोललो आहे. पण हे सत्य आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले होते?

“जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. २ जुलै रोजी अजित पवार आणि आमच्या काही नेत्यांनी या सरकामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५ आणि १६ जुलै अशा दोन वेळा आम्ही मुंबईत शरद पवार यांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली. साहेब जे झाले ते झाले. तुम्ही आमच्या निर्णयाबरोबर येण्याचे पसंत केले नाही. पण आमची तुम्हाला विंनती आहे की, तुम्ही आमच्याबरोबर या. कारण आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. त्यामुळे प्रयत्न करण्याच्याबाबतीत आम्ही काही कमी केली नाही. त्यानंतर पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यामुळे यामधून असे संकेत दिसत होते की, आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती आणि ते (शरद पवार) ५० टक्के तयार होते”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on praful patel statement in sharad pawar ncp politics gkt
Show comments