गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला जावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अद्याप स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, त्याचवेळी आता सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी दिली जावी, यासाठी प्रयत्न होताना दिसू लागले आहेत. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून त्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) माहिती दिली आहे.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाची मागणी

देवेंद्र फडणवीसांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या वतीने कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. पारिजात पांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं एक निवेदन दिलं. या निवेदनात सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ उपाधी प्रदान केली जावी, अशी मागणी केली आहे. यांदर्भात देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी कौन्सिलकडून करण्यात आली आहे. याबाबत माहिती देतानाच त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची एक्सवरील पोस्ट…

“स्वातंत्र्यवीर सावरकर हे १९०६ मध्ये ब्रिटनला गेले आणि तिथे त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र उत्तीर्ण होऊनही त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक म्हणून असणाऱ्या योगदानामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना बॅरिस्टर उपाधी प्रदान केली नाही. आता ती बॅरिस्टरची उपाधी मरणोपरांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रदान करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारे एक निवेदन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. पारिजात पांडे यांनी दिले. यासंदर्भात केंद्र सरकारला पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे”, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.