परवानगी देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

वसई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लोकलने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, या अत्यावश्यक सेवेत खासगी बँकांचे कर्मचारी येत असूनही त्यांना लोकलने प्रवास नाकारला जात असल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या बँक कर्मचाऱ्यांची बँकेत जाण्यासाठी फरफट होत आहे.

शासनाकडूनच दुजाभाव केला जात असल्याचा आरोप या बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसई-विरार, पालघर या ठिकाणच्या भागांतून अनेक बँक कर्मचारी हे मुंबईसह इतर ठिकाणच्या बँक शाखेत काम करीत आहेत. हे कर्मचारी आधी लोकलने प्रवास करीत होते. परंतु करोनाच्या वाढत्या संकटामुळे लोकलने केवळ अत्यावश्यक व शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बँकेचे कामकाज जरी अत्यावश्यक सेवेत येत असले तरी खासगी व सहकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लोकलने प्रवास करण्यास समावेश करण्यात आला नाही. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येत नाही.

बँकेचा अत्यावश्यक सेवामध्ये समावेश करायचा आणि बँकेच्या कर्मचारी यांना रेल्वेमध्ये प्रवास करण्यास मुभा द्यायची नाही अंत्यत चुकीचे असल्याचे मत बँक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे पालघर जिल्ह्य़ातील सर्व खासगी व सहकारी बँकेचे कर्मचारी आता शासनाला ट्विटवर ट्विट करून ई-मेल करून आपला संताप व्यक्त करत आहेत.

लोकलमध्ये प्रवासाला मुभा दिली जात नाही यामुळे या कर्मचाऱ्यांना दररोज महामार्गावरून खासगी वाहनाने व इतर वाहनाने प्रवास करावा लागतो. यासाठी मोठय़ा प्रमाणात वेळ व पैसा हे दोन्ही खर्च होत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी शासनाने याची दखल घेऊन खासगी व सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

लोकलने प्रवास करण्यास मुभा नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाळेबंदी असल्याने पटकन बँकेत कामावर जाण्यासाठी वाहन मिळत नाही यामुळे बराच वेळ प्रवासासाठी खर्च होतो.

– जयेश भोईर, कर्मचारी, आयसीआयसीआय बँक

लोकलने प्रवास दिला जात नाही यामुळे दररोज विरार ते अंधेरी असा प्रवास खासगी वाहनाने करावा लागतो. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचने कठीण होऊन जाते. आधीच कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू आहे. यासाठी खासगी बँक कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची मुभा द्यावी.

– लेरॉय कोरिया, कर्मचारी, एचडीएफसी बँक