ऊर्जा प्रकल्पातील राखेच्या वाहतुकीवरून वाद विकोपाला

लोकसत्ता प्रतिनिधी 

पालघर : अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या कोळशाच्या राखेच्या वाहतुकीवरून रण पेटले आहे.  ग्रामस्थ आणि वाहतूकदार यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राखेचा वाहनांमधील भरणा आणि तिची वाहतूक करण्याच्या कामात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गावातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दहा हजार लोकसंख्या असलेल्या आसनगाव या डहाणू तालुक्यातील गावांत मोठय़ा प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. आसनगावातील सुमारे अडीचशे हेक्टर जमिनीवर अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या राखेचे पेव आहेत. त्यामध्ये रोज सुमारे १०० ते १५० टन कोळशाची राख द्रव्यरूपात जमा होत असते. वापरानंतर ही राख पूर्वपरवानगीने विनामूल्य नेण्यास प्रकल्पाकडून खुली ठेवण्यात आली आहे.  आसनगाव ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि भूमिपुत्र असोसिएशन या दोन संस्थांच्या माध्यमातून गावातील तरुण या राखेची वाहतूक करण्याच्या व्यवसायात होते.

मात्र, गेले काही महिने काही खासगी वाहतूकदार आणि स्थानिकांमध्ये राखेच्या वाहतुकीवरून मतभेद निर्माण झाले असून त्यांच्यातील वाद विकोपास गेला आहे.

दरम्यानच्या काळात ट्रकमध्ये राख भरण्यास  सहकार्य न केल्याचे कारण पुढे करीत खासगी वाहतूकदारांचे ट्रक अडवणे, त्यांची नासधूस करणे असे प्रकार घडल्याने वाणगाव पोलीस ठाण्यात काही स्थानिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील काहीजणांना अटकही करण्यात आली होती.दरम्यान डहाणू औष्णिक प्रकल्पाच्या राख पेवांसाठी जागा स्थानिकांनी उपलब्ध करून दिली आहे. या राखेची त्यात साठवणूक केल्याने आसनगाव परिसरातील घरे आणि झाडांवर राखेचा थर साचत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  या भागातील बागायतीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शेत, तसेच बागायती व्यवसाय करणे कठीण झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.  अशा परिस्थितीत येथील बेरोजगारांना राख गाडीमध्ये भरण्याचा (लोडिंग) ठेका देण्यात यावा तसेच स्थानिकांच्या  मालकीचे ट्रक या कामात वापरण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. राखेच्या पेवांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना या प्रकल्पाच्या ठिकाणी सामावून घेण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली  आहे.

नियम पाळण्याच्या सूचना

यासंदर्भात अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्प व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता आसनगाव येथील राखेचे पेवांमधून राखेची वाहतूक करण्याची मुभा सर्वाना देण्यात आली आहे. मात्र, ती कोणत्या ठिकाणी नेण्यात येणार आहे, याची माहिती देणे तसेच या राखेची वाहतूक बंदिस्त वाहनांमधून करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. पेवांमध्ये (अ‍ॅश पॉन्ड) गोळा होणारी राख हवेत मिसळू नये म्हणून त्यावर पाणी शिंपडून ओल्या स्वरूपात ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रकल्पाच्या मुख्य प्रवक्त्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना या वेळी दिली.

समन्वय नाही?

दसऱ्यानंतर राख वाहतुलीला आरंभ होतो. रोज १२, दहा चाकी आणि सहा चाकी किमान १२ वाहनांमधून ५०० ते ६०० टन राख वाहतूक करण्यास आरंभ होतो.  या भागात सध्या तणावपूर्ण वातावरण असून समन्वय साधण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.