इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आता धम्मचक्र प्रवर्तन दिनाला होऊ घातले आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसने मंगळवारी केलेल्या भूमिपूजनास अर्थ नसून ते केवळ श्रेय लाटण्यासाठी केलेले राजकारण असल्याचा आरोपही बडोले यांनी केला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये वास्तव्यास होते. ते घर महाराष्ट्र शासन खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यात वाचनालयही असेल. स्मारकाची निगा केंद्र वा राज्य शासनापैकी कुणी राखावयाची, याबाबत निश्चित धोरण आखले जाणार आहे. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे अध्यासन सुरू केले जाणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासवृत्ती दिली जाईल, असेही ते म्हणाले.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे १२४ वे जयंती वर्ष असून महाराष्ट्र शासन ‘समता व न्याय वर्ष’ म्हणून ते साजरे करणार आहे. बौद्ध तीर्थ, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधित ठिकाणांचा विकास केला जाईल. शिष्यवृत्ती घोटाळ्यात सहायक आयुक्त व कारकुनावर कारवाई करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. त्यात दोषींवर कारवाई केली जाणारच आहे. मुळात पूर्वी ऑफलाईन पद्धत असल्याने, तसेच इतरही कारणांनी गैरप्रकार घडले.  केंद्राकडून मंजुरी उशिरा प्राप्त झाल्या. आदिवासी विभागानेही वेगळीच यादी दिली. अनेक महाविद्यालये प्रवेश देताना पूर्ण पैसे घेतात. मात्र, नंतर ते पैसे परत देत नाहीत. त्यांचीही चौकशी केली जाईल. आता ऑनलाईन पद्धत असल्याने गैरप्रकारास वाव नसल्याचे स्पष्ट केले.