नोंदी होत नसल्याने १७० पैकी ४० गावांमध्ये योजना बारगळण्याची चिन्हे

वाडा: महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ६ जिल्ह्यांत मोबाइलमधून अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. यात संपूर्ण कोकण विभागातून वाडा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र तालुक्यातील जवळपास ४० गावांमध्ये इंटरनेट सेवा पोचत नसल्याने या गावांतील ई-पीक पाहणी नोंदी रखडल्या आहेत.

वाडा तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात मुख्यत: भातपिकाची लागवड केली जाते. शेती क्षेत्राची पीक पाहाणीची अचूक नोंद व्हावी, यासाठी अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणी करण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील १७० गावांपैकी ४० गावांमध्ये इंटरनेट सेवा मिळत नसल्याने ई-पीक पाहणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या वनपट्टय़ांच्या नोंदीही ई-पीक पाहणीत होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेती क्षेत्राची नोंदही ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

वाडा हा ग्रामीण तालुका असून बहुतांश भाग डोंगराळ भागात विखुरला आहे. जलद गतीने चालणारे इंटरनेट ही येथील सर्वात मोठी समस्या असून ई- पीक पाहणी अ‍ॅपमध्ये ऑनलाइन माहिती भरण्यास यामुळे अडचणी येत आहेत. कित्येक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना या प्रकल्पाचा लाभ किती होईल याबाबत शंका व्यक्त केली जात असून सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचीही अडचण निर्माण होत आहे. गारगाव सजा तलाठी एम.के.दुतारे यांनी २५ ऑगस्टला पीक गावात येऊन प्रात्यक्षिक देण्याचा प्रयत्न केला, मात्र इंटरनेट व स्मार्टफोन अनेक शेतकऱ्यांकडे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली.

तहसीलदारांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन

माझ्याकडे स्मार्टफोन नसून आमच्या गावात इंटरनेट किरकोळ स्वरूपात चालते. आम्ही या योजनेचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला पण तांत्रिक अडचणी दूर नाही झाल्या तर ही योजना कागदावर राहील असे आम्हाला वाटते. या अनुषंगाने शासनाने अनेक गावांत इंटरनेट नाही याचा धडा घेऊन काहीतरी सुधारणा करावी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून यात येणाऱ्या अडचणींवर शासन नक्कीच विचार करीत आहे. तर एका मोबाइलद्वारे २० शेतकऱ्यांचे पीक पाहणी नोंदविणे शक्य असल्याने यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, तरुणांनी पुढे येऊन ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन वाडा तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी केले आहे.

काही गावांत इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नसल्याने ई-पीक पाहणी नोंदी करण्यास अडचणी निर्माण होत असून याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. तर वनपट्टा धारकांची नोंद इतर हक्कात होत असल्याने त्यांची नोंद होत नाहीत.

– डॉ. उद्धव कदम, तहसीलदार वाडा तालुका