नितेश राणेंच्या आरोपात तथ्य नाही

कराड : कराडच्या मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोंबरच्या सकाळी झालेला गंभीर भीषण स्फोट हा बॉम्ब सारख्या घातक वस्तू अथवा  घटकांमुळे झालेला नसल्याचे फॉरेन्सिक चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर, गॅस गळतीच्या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण नसते हे वास्तव असल्याने या स्फोटाचे गूढ कायम राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक कार्यकर्ते शरीफ मुबारक मुल्ला (३५) यांच्या घरात झालेल्या या स्फोटात चार-पाच घरे, सहा दुचाकींचे नुकसान होताना, शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी सुलताना (३३), दोन लहान मुले व नजीकच्या घरातील असे एकूण आठ ते नऊजण जखमी झाले होते. त्यात जखमी मुल्ला कुटुंबीयांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, घटनेच्या आठव्या दिवशी सुलताना मुल्ला यांचा तर, लगेचच शरीफ मुल्लांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. दरम्यान, या स्फोटाच्या घटनेबाबत उलट-सुलट चर्चा, अनेक शंका-कुशंका वर्तवल्या जात होत्या.

हेही वाचा >>> डॉक्टरच्या सतर्कतेमुळे बालविवाह उजेडात; भटजीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळावरील माहिती घेत पत्रकार परिषदेत हा गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेला स्फोट नसून, राष्ट्रविरोधी कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉम्बच्या टेस्टिंगवेळी झालेला असल्याचा गंभीर आरोप होता. शरीफ मुल्लाचा त्यांनी जिहादी म्हणून उल्लेख करताना, पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले होते. या एकंदर प्रकरणातील गुन्हेगारांची पोलीस पाठराखण करीत असून, यात राजकीय हस्तक्षेपही असल्याचा आरोप करीत यासंदर्भात त्यांचा स्थानिक आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर रोख होता.

हे सारे प्रकरण अतिशय गंभीर आणि देशाच्या सुरेक्षेला बाधा आणणारे असल्याने  दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) याची चौकशी करावी अशी आपली मागणी आहे. फॉरेन्सिक चाचणी पथकाचा अहवाल येण्यापुर्वीच जर हा स्फोट गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचे पोलीस म्हणत असतील तर त्याची पोलखोल आपण करू, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असल्याचे अधिकारी व इतरांनी दुर्लक्षित करू नये, कुणाचीही गय होणार नाही असे इशारे आमदार राणे यांनी दिले होते. या प्रकरणी आपण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करणार आहोत. त्यातून, आणि ही त्यादिवशीची ब्रेकिंग न्यूज असेल असा दावा आमदार राणे यांनी केला. आता भाजपच्या आणि हिंदुत्ववादी सरकारच्या यंत्रणेकडून (फॉरेन्सिक लॅब) झालेल्या चाचणी तपासणीचा अहवाल नकारात्मक  (निगेटिव्ह रिपोर्ट) आल्याने आमदार राणेंच्या आरोपात तथ्य नसल्याचे सध्यातरी म्हणावे लागत आहे. त्यामुळे ही घटना आणि त्या अनुषंगाने झालेले आरोप या अंगाने विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात काय चर्चा होत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosion in karad was not a bomb negative report from forensic lab zws