घोडाझरी अभयारण्याच्या घोषणेमागे दडलंय काय ?; पुनर्वसनाच्या प्रश्नासह इतरही अडचणी

नवीन अभयारण्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळते, असे राज्य शासनाकडून सांगितले जात असले तरी यापूर्वीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ७९ गावांतील किती स्थानिक लोकांना रोजगार मिळवून दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उलट यामुळे नेत्यांच्या आजूबाजूला वावरणारेकंत्राटदार, भांडवलदार यांचेच भले होते. गरीब शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी करुन त्या चढय़ा भावाने विकायच्या तसेच रिसोर्ट व पंचतारांकीत हॉटेल उभारून बक्कळ पैसा कमावायचा,असे प्रकार यातून साध्य होते, अशी चर्चा घोडाझरी अभयारण्याच्या निर्मितीच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि या प्रकल्पात वास्तव्य करणाऱ्या ८८ वाघांमुळे चंद्रपूर जिल्हय़ाचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे समोर आले. पर्यटकांना ताडोबातील वाघ आकर्षित करीत आहेत. ताडोबासोबतच या जिल्हय़ात आणखी काही अभयारण्याची निर्मिती व्हावी यासाठी वनखात्याचे प्रयत्न सुरू होते. त्यात प्रामुख्याने राजुरा परिसरातील कन्हाळगावचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तर ब्रह्मपुरी वन विभागात घोडाझरी अभयारण्याच्या निर्मितीचाही प्रस्ताव होता. कन्हाळगावला स्थानिकांचा विरोध असल्याने घोडाझरी या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता दिली. यामुळे आजूबाजूच्या ५९ गावांमध्ये रोजगारनिर्मिती होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अभयारण्याच्या निर्मितीनंतर स्थानिकांना रोजगार मिळतो की त्यांच्या अधिकारावर गदा येते हा प्रश्न आहे. अभयारण्य झाले तर गावकऱ्यांना आजच्या सारखे जंगलात जाण्यावर र्निबध आले आहेत. जंगलातून रानमेवा, बांबू, लाकूड, सरपण आदी गोळा करण्यावर र्निबध आले आहेत. मुळात अभयारण्यामुळे रोजगार निर्मिती होते यावरच या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुसंख्य स्वयंसेवी संस्था, वन्यजीव संस्था तथा सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. रोजगाराच्या नावाखाली नेत्यांच्या पिलावळांना जमीन खरेदी विक्री, रिसोर्ट व पंचतारांकित हॉटेल उभारून बक्कळ पैसा कमवण्याची संधी मिळते.

ताडोबातच रोजगाराचे असंख्य प्रश्न निर्माण झाले असतांना घोडाझरीतील ५९ गावांत कुठून रोजगार आणणार असा प्रश्न जलबिरादरीचे संजय वैद्य यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे कन्हाळगाव अभयारण्याचा प्रस्ताव हा खूप जुना आहे. मात्र अभयारण्य झाले तर गावकऱ्यांच्या अधिकारावर गदा येईल या एकमेव कारणामुळे तेथील ग्रामस्थांनी अभयारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी स्वत: हेलिकॅप्टरने कन्हाळगाव येथे आले होते. मात्र गावकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध बघता हा प्रस्ताव बारगळला. कन्हाळगाव बारगळल्यामुळेच घोडाझरीची अभयारण्याची निर्मिती झाली अशीही एक चर्चा आहे.

ताडोबा-अंधारीत रोजगार शून्य

आज ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला इतकी वष्रे झाली, तरीही या प्रकल्पातील मोहुर्ली, सितारामपेठ, झरी, कोलारा, खुटवंडा, नवेगांव, पांगडी ही सात आठ गावे सोडली तर ताडोबातील ७९ गावात शून्य रोजगार निर्मिती आहे. त्यामुळे घोडाझरी लगतच्या ५९ गावातील लोकांना रोजगार मिळेल हा शुध्द मुर्खपणा आहे. त्यातही रोजगार मिळालाच तर जिप्सी, चालक, गाईड, रिसॉर्टमध्ये स्वयंपाकी, वेटर व सफाई कामगार या शिवाय रोजगार नाही. राज्यातील पहिल्या सहा महिला गाईड ताडोबात आहेत. त्यांना लिंगभेदामुळेच रोजगार मिळत नाही तर घोडाझरीत कुठून रोजगार येणार असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.    मोहुर्ली येथे सध्या रोजगार मिळावा म्हणून स्थानिक विरूध्द बाहेरचे असा संघर्ष पेटला आहे. सरकारने ‘होम-स्टे’ रोजगार देवू असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात पर्यटक रिसोर्ट व एमटीडीसीच्या पंचतारांकीत हॉटेलात मुक्कामी असतात. त्यामुळे ‘होम- स्टे’ला बुकिंग नाही.

‘भांडवलदारांच्या हितासाठी’

अभयारण्याची निर्मिती ही रोजगारासाठी नाही तर भांडवलदारांच्या हितासाठी आहे. ते रोजगार निर्मितीचे साधन होऊच शकत नाही. फार तर जंगली प्राण्यांचे संरक्षण होवू शकते. स्थानिकांना स्थलांतरित करून त्याचे योग्य पुनर्वसन होणार नाही, जे काही होईल त्यासाठी लाखो झाडे तोडली जातील. स्थलांतरणामुळे त्याच्या रोजगार व राहण्याचे नवीन प्रश्न निर्माण होतील. आजवर बाहेरच्या व्यावसायिकांनीच येवून रिसोर्ट बांधले आहेत. बहुसंख्य जिप्सी बाहेरच्या लोकांच्या तथा रिसोर्टच्या नावावर आहेत. रिसोर्टमधील गर्दीमुळे ‘होम-स्टे’ ला प्रतिसाद नाही. जनवन योजनेंतर्गत केवळ शासकीय योजना राबविल्या जातात. त्याला रोजगार म्हणता येणार नाही. अगरबत्ती, चरखा व इतर योजनांसाठी अभयारण्य घोषित करण्याची गरज काय. हे प्रकल्प तर अभयारण्या शिवाय राबविले जावू शकतात. –अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी, संस्थापक अध्यक्ष, श्रमिक एल्गार संघटना

१५ वाघ,२३ बिबटे

घोडाझरी या वनक्षेत्रात १० ते १५ वाघ, २३ बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, कामड आणि ससे यासारखे वन्यजीव वास्तव्यास आहेत. विविध प्रकारचे कोळी पक्षी, विविध जातींचे मासे, रंगबेरंगी फुलपाखरे आहेत. या वन्यप्रांण्यांसोबत संरक्षित वनात साग, बांबू, मोहा, जांभुळ, शिसम आदि वृक्षांच्या प्रजाती येथे आहेत. झुडपांच्या व वेलींच्या प्रजाती येथे आहेत. बांबूला पकडून अनेक जातीचे गवत या प्रकल्पात आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे गुफा, मचाण आणि बरेच काही घोडाझरी अभयारण्यात आहे.