तृतीयपंथीयांनी बुधवारी विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. आम्हाला घरात मान नव्हता. बाहेरही समाजाने नाकारले, पण प्रथमच स्वातंत्र्यानंतर मतदानाचा हक्क देऊन सन्मान केला. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
नगर शहरातील तृतीयपंथीयांनी सावेडी भागातील समर्थ शाळा केंद्रावर मतदान केले. काजल गुरू यांच्या नेतृत्वाखाली मतदानासाठी हे सर्व एकत्रितच आले होते. रांग लावून त्यांनी मतदान केले. श्रीरामपूर येथे रेल्वेस्थानकासमोरील पंचायत समिती विश्रामगृहाच्या ९५ क्रमांकाच्या मतदान केंद्रात आज २१ तृतीयपंथीयांनी मतदान केले. तेही मतदानाला एकत्रित आले होते. नटूनथटून आलेले हे मतदार बघून लोकांना आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे त्यांना उपस्थित कार्यकर्ते व मतदारांनी दाद दिली. कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
िपकी शेख या तृतीयपंथीयाने सांगितले, की आतापर्यंत आम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता. अन्यत्र आम्हाला मतदानाची संधी होती. काही निवडणुकीला उभे राहत. पण जिल्ह्यात न्याय मिळाला नव्हता. आमची नेता काजल हिने सरकारकडे प्रयत्न केल्याने त्याला यश आले. मतदानाचा अधिकार मिळाला. आता आम्हाला पॅनकार्ड िंमळाले. पण अद्याप शिधापत्रिका मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी केली. आमच्यातील अनेक जणी पदवीधर आहेत. पण आम्हाला सन्मान मिळत नव्हता. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदललेला नाही. पण आता मतदानामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलेल व न्याय मिळेल, असे तिने सांगितले. पिंकीप्रमाणेच तमन्ना शेख, खुशी, आयेशा, रेखा, राशी, नूरजा, भावना, सोनी, लाडो यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहात होता.