राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या वध्र्यातील राष्ट्रभाषा प्रचार समितीचे नाव शिष्यवृत्ती घोटाळ्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बोगस विद्यार्थी दाखवून शासनाकडून कोटय़वधीची शिष्यवृत्ती उकळून घेत राज्यातील शेकडो शिक्षण संस्थांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतलेल्या या घोटाळाप्रकरणी सध्या गडचिरोलीत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात राष्ट्रभाषा प्रचार समितीही दोषी असल्याचे सांगितल्याने हे प्रकरण गंभीर झाले आहे.
देशभरात हिंदीचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या समितीचे व्यवस्थापन आजवर अनेक मान्यवर गांधीवादी सांभाळत आले आहेत. विविध शाळांमधून हिंदीच्या परीक्षा घेणाऱ्या या समितीने केंद्राच्या दूरस्थ शिक्षण मंडळाकडून पाच वर्षांपूर्वी किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मिळवली. हे अभ्यासक्रम समितीने स्वत:च चालवावे, या अटीवर ही परवानगी देण्यात आली. गांधीवादय़ांची संस्था हे वलयसुद्धा ही परवानगी मिळवण्यात कारणीभूत ठरले. यानंतर मात्र समितीने वध्र्यातच स्थापन केलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञानमंडळ या संस्थेला हे अभ्यासक्रम चालवण्यासाठी दिले. या ज्ञानमंडळाने राज्यातील २६२ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाची केंद्रे दिली. हे करार करताना या केंद्रांनी त्यांच्या उत्पन्नातील ठरावीक वाटा ज्ञानमंडळ व राष्ट्रभाषा प्रचार समितीला द्यावा, असे ठरले. हा व्यवहार ज्येष्ठ गांधीवादी माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीचे अध्यक्ष असताना झाला. या केंद्रांनी हे अभ्यासक्रम बोगस विद्यार्थी दाखवून चालवले व या विद्यार्थ्यांच्या नावावर राज्य शासनाकडून कोटय़वधीची शिष्यवृत्ती उकळली, हे तपासात सिद्ध झाले आहे. यात झालेल्या आर्थिक उलाढालीत राष्ट्रभाषा प्रचार समितीलासुद्धा वाटा मिळाल्याने आता ही गांधीवादय़ांची संस्था संकटात सापडली आहे. तीन वर्षांपूर्वी शासनाने केलेल्या चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे, पण गांधीवादय़ांच्या वावरामुळे या समितीला जाब विचारण्याची हिंमत कुणी केली नाही. या संदर्भात धर्माधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी या गैरव्यवहारावर बोलण्याचे टाळले. मात्र, सध्या देशातील प्रत्येक संस्था या ‘मॉल’ झाल्या आहेत, अशी टिप्पणी केली. राज्यभरात सुरू असलेले व्यावसायिक अभ्यासक्रम हे केवळ पैसे लाटण्याचा धंदा झाल्याचे अनेकदा स्पष्ट झालेले असताना आदराचे स्थान असलेल्या या गांधीवादी संस्थेला यात उतरावे असे का वाटले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

तीन लाख रुपये मिळाले
या संदर्भात समितीचे सचिव प्रा. अनंतराम त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता हा अभ्यासक्रमासंबंधीचा प्रकार आधीच्या कार्यकारिणीने घडवून आणला होता. आधीच्या पदाधिकाऱ्यांनी हे का केले, हे कळायला मार्ग नाही. समितीने स्थापन केलेल्या ज्ञानमंडळाकडून हिंदी साहित्य संमेलनासाठी ३ लाख रुपये मिळाले होते. या व्यतिरिक्त काहीही माहिती नाही, असे ते म्हणाले.