शेतीमाल कुजला, द्राक्षावर रोग, रब्बी हंगामात अडथळे

पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतीमालाच्या नुकसानीपासून विविध रोगांच्या आगमनामुळे बळिराजा धास्तावला आहे. यंदा खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास संततधार पावसाने कुजण्याच्या मार्गावर असून द्राक्ष पिकावर दावण्याचा हल्ला झाला आहे. खरिपातील सोयाबीन, भात ही पिके काढणीच्या स्थितीत असताना संततधार पावसाने काढणी, मळणी करता येत नसल्याने पिकाची हानी तर झाली आहेच पण, रब्बीच्या पेरणीला पोषक पाऊस झाला असला तरी घातच नसल्याने पेरणी लांबली आहे.

खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक तयार होऊन पंधरा दिवसांचा अवधी झाला आहे. काही सोयाबीन सततच्या पावसाने काढणे अशक्य झाले असून काढलेले सोयाबीन मळणी यंत्रावर दमट असल्याने दाणा सुटण्याऐवजी लगदाच होत आहे. तर पावसापासून बचावलेले सोयाबीन आद्र्तायुक्त असल्याने बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने विकावे लागत आहे. शिराळा तालुक्यात भाताच्या लोंब्या जागेवरच फुटू लागल्या आहेत.

सततच्या पावसाने डोंगरदरीतील रानांना नीर लागले असून रब्बी पिकाची पेरणीही करता येत नाही. रब्बी हंगामातील शाळू पिकाला पेरणी योग्य पाऊस होऊनही करलाट रानात रोज कमी-अधिक प्रमाणात होणाऱ्या पावसाने कुरी चालत नाही. परिणामी पावसाचा वाढलेला मुक्काम नुकसानकारक ठरत आहे. द्राक्षाच्या आगाप छाटण्या झालेल्या असून रात्री-दिवसा कधीही पडणारा पाऊस, पहाटेचे धुके, दुपारच्या वेळी चपापणारे उन्ह या विषम वातावरणामुळे दावण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.

द्राक्ष मणी फुलोऱ्यात आलेल्या बागेवर या रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होत असून मिरज पूर्व भागात अनेक बागा वाया गेल्या आहेत. सकाळी पानावर दावण्या पांढरा ठिपका दिसला तर सायंकाळपर्यंत एकराच्या बागेत सायंकाळी घडाच्या मुळापर्यंत पोहचतो आणि २४ तास उलटण्यापूर्वी अख्खी बाग नामशेष होते. यामुळे दावण्याची लागण झालेला घड काढणे हाच पर्याय आहे.

जर दावण्याला प्रतिबंध करण्यासाठी महागडय़ा औषधांची फवारणी केली, तर कधीही येणाऱ्या पावसाने औषध फवारणी प्रभावहीन होत असल्याने द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. काही बागायतदारांनी द्राक्षाची छाटणी लांबणीवर टाकली आहे. मात्र, ऑगस्टअखेरीस आणि सप्टेंबरमध्ये छाटणी झालेल्या बागा दावण्याच्या तडाख्यात सापडल्या आहेत.

((सततचा पाऊस, पहाटेचे धुके, ऑक्टोबर हीटची अनुभूती देणारे ऊन अशा विषम वातावरणामुळे द्राक्षावर दावण्याचा प्रादुर्भाव झाला असून घड काढून टाकणे हाच पर्याय मिरज तालुक्यातील खटाव येथील शेतकरी अशोक नरदे यांनी स्वीकारला आहे.