वसमत तालुक्यात विज पडल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनेत तीन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी घडली.यामधे एक पुरुष, एक महिला व एका तरुणीचा समावेश आहे.

वसमत तालुक्यातील खांडेगाव शिवारात फाटा (ता.वसमत) येथील गयाबाई प्रकाश काकडे (वय४८) यांचे शेत आहे. आज सकाळी श्रीमती काकडे व त्यांची नातेवाईक लोचना नारायण काकडे (वय१६) ह्या दोघी शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पावने पाच वाजता अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे त्या दोघीही शेतातील झाडा जवळ थांबून गावात येण्यासाठी आवरा आवर करीत होत्या. याचवेळी त्यांच्या अंगावर विज कोसळली. यामधे दोघींचाही मृत्यू झाला.

शेतात विज पडल्याचा आवाज आल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी दोघींचे मृतदेह आढळून आले. दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक दिगंबर कांबळे यांच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. तसेच तहसीलदार ज्योती पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली.

वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात विज पडून एक जण ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.१९) सायंकाळी घडली आहे. गुंडा येथील बाबाराव गंगाराम चव्हाण (वय६५) हे पाऊस येत असल्यामुळे शेतात झाडाखाली थांबले होते. यावेळी झाडावर विज पडल्यामुळे चव्हाण यांचा मृत्यू झाला. या झाडाजवळच इतर पाच ते सहा जण थांबले होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.