महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या नव्या झेंड्यावर वापरण्यात आलेली राजमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे चुकीचे आहे. झेंड्यावरून ही राजमुद्रा तातडीने हटवण्यात यावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी कोल्हापुरात केली. मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा हा शिवप्रेमींचा अवमान आहे अशी टीकाही त्यांनी केली.
राजमुद्रेचे महत्व विशद करताना सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशपत्रावरच राजमुद्रा उमटवली जात असे. तिचा इतरत्र वापर झाला नव्हता.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेचा आकार वाकडा तिकडा केला आहे. ही राजमुद्रेची नक्कल आहे. राज ठाकरे हे जरूर शिवप्रेमी आहेत. राज ठाकरे आणि त्यांचे गुरू बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे जाणकार असल्याचे सांगतात. पण त्यांनी मनसेच्या झेंड्यावर वापरली जाणारी राजमुद्रा, त्यावरील सुलेखन याबद्दलही काळजी घेतली नसल्याचे दिसते. अस्सल आणि नक्कल यामधला फरक राज ठाकरे यांनाही कळला नाही याचे विशेष वाटते असाही टोलाही त्यांनी लगावला आहे. काहीजण वैयक्तिक प्रेमाने वाहनांवर, घरामध्ये राजमुद्रेचे स्टिकर लावतात. अशांनी राजमुद्रेचा सन्मान झाला पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.