अवैध सावकारीतून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, तसेच शेतमजुरांची लूट करणाऱ्या सावकारांविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचा फास आवळला आहे. जमीन, सोने तारण ठेवून गरजूंना कर्ज देऊन वारेमाप व्याज घेणाऱ्या पाच सावकारांवर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या पाचपकी दोन सावकार सोलापूर, तर उर्वरित तिघे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. या आदेशामुळे अवैध सावकारी करणाऱ्या सावकारांचे धाबे दणाणले आहेत. 

कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथील पांडुरंग विठ्ठल घोगरे यांनी गतवर्षी गावातील अवैध सावकारी करणाऱ्या मंडूबाई विठोबा पवार यांच्याकडून ४० आर इतकी जमीन खरेदीखत करून घेऊन कर्ज दिले होते. हा व्यवहार अवैध सावकारीतून घडल्याचे उघड झाल्यानंतर मंडूबाई पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले. उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील नरसिंग म्हाळप्पा सुरवसे यांनी मुरुम येथील राजू खासीम मोमीन यांच्याकडून जमीन तारण ठेवून कर्ज घेतले. मोमीन यांनी एक हेक्टर क्षेत्राचे सुरवसे यांच्याकडून खरेदीखत करून घेतल्याचे सहायक निबंधकांनी केलेल्या चौकशीत निदर्शनास आले. सुरवसे यांनी घेतलेली कर्जाऊ रक्कम परत केली, तरीही मोमीन यांच्याकडून जमीन परत दिली जात नसल्याचेही यात उघड झाले आहे. उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील परुतप्पा बसवंतप्पा उटगे यांनी गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला सोलापूर येथील चंद्रशेखर शरणप्पा उटगे यांच्याकडून एक हेक्टर एक आर जमीन तारण ठेवून कर्ज दिले. हा व्यवहार अवैध सावकारीतूनच झाल्याचे सहायक निबंधकांच्या चौकशीत उघड झाले. तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील ज्ञानेश्वर बाबुराव राजमाने यांनी गतवर्षी गावातीलच भारतबाई गणपतराव नकाते यांना आपली एक हेक्टर ९३ आर जमीन खरेदीखत करून दिली. यापोटी त्यांनी घेतलेले कर्ज परत करूनही जमीन परत दिली नसल्याचे समोर आले. उस्मानाबाद तालुक्यातील सोनेगाव येथील विठ्ठल दत्तात्रय घाडगे यांनी बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील अवैध सावकार हरिभाऊ ज्ञानोबा नलावडे यांच्याकडून कर्ज घेतले. नलावडे याने घाडगे यांची एक हेक्टर २८ आर जमीन खरेदीखत करून घेतली. सहायक निबंधकांनी केलेल्या चौकशीत हा व्यवहार अवैध सावकारीतून झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या पाचही अवैध सावकारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले आहेत.