नगर : पारनेर शहरात आज, गुरुवारी सकाळी नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गावठी कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच फसल्याने पठारे बचावले. पठारे यांच्या समवेत असलेल्या एकाने गोळीबार करणाऱ्याच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. ते विखे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. घटनेनंतर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांनी दूरध्वनीवरून पठारे यांची चौकशी केली. गोळीबाराचा प्रयत्न करणारा अल्पवयीन असून तो पारनेर तालुक्यातीलच रहिवासी आहे. नगरसेवक पठारे यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला, याची चौकशी पोलीस करत आहेत. संबंधीत अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पारनेर पोलीस ठाण्यासमोर पठारे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा… अग्रलेख : फिटे अंधाराचे जाळे…

पारनेर शहरातील बसस्थानकालगत असलेल्या मुख्य चौकातील हॉटेल दिग्विजयमध्ये नगरसेवक पठारे त्यांच्या मित्रांसह चहा घेत होते. तेथे अल्पवयीन युवक गावठी कट्टा व चाकू घेऊन आला. त्याने युवराज पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा रोखला व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी कट्ट्यातच अडकल्याने केवळ आवाज झाला. तेथे उपस्थित असलेले पठारे यांचे सहकारी भरत गट यांनी त्या युवकाच्या हातून कट्टा हिसकावून घेतला. त्याच्या समवेत असलेले दोन तरुण पळून गेल्याचे सांगितले जाते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या मुलाने आपण एकटेच आहोत, असे पोलिसांना सांगितले असले तरी पोलीस त्याबाबत खातरजमा करत आहेत. गोळीबाराच्या प्रयत्नाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे जुने भांडत कारण असल्याचे चर्चा होत आहे.

हेही वाचा… NCP MLA Disqualification Verdict Live: शरद पवार गटाला धक्का; अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दोन्ही गटाचे आमदार पात्र!

पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बारवकर यांनी काही दिवसांपूर्वीच सूत्रे स्वीकारली आहेत. गोळीबाराच्या प्रयत्नाच्या कारणाची चौकशी केली जात असल्याचे व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In parner city of ahmednagar district corporator yuvraj pathare escaped as the bullet got stuck in revolver which fire by minor boy asj
Show comments