भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशपातळीवर १८ राज्यातील ५१ व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा ‘इंडिया फॉर टायगर्स – अ रॅली ऑन व्हील्स’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत छत्तीसगड राज्यातील अचानकमार व्याघ्र प्रकल्पातून निघालेल्या रॅलीचे बोर व्याघ्र प्रकल्पात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

रॅली ऑन व्हील्सच्या निमित्ताने बोर व्याघ्र प्रकल्पातील वनपाल, वनरक्षक, पर्यटक मार्गदर्शक, प्राथमिक प्रतिसाद दलाचे सदस्य यांच्या सहभागात नवरगाव पुनर्वसन ते बोरधरण यादरम्यान दुचाकी यात्रा काढण्यात आली. तसेच छत्तीसगड राज्यातून अचानकमार, उदंती, गाझियाबाद, इंद्रावती बिजापूर, महाराष्ट्र राज्यातील ताडोबा अंधारी, नवेगाव नागझिरा, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालय असे मार्गक्रमण करीत बोर प्रकल्पात पोहचलेल्या रॅलीचे पर्यटन संकुलात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी शतानिक भागवत, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी राहुल गवई, मानद वन्यजीव रक्षक तथा व्याघ्र संनियंत्रण सल्लागार समिती सदस्य संजय इंगळे तिगावकर, छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. अग्रवाल, अचानकमार व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक यादव, उदंती व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नेताम, इंद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय कावरे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक आत्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी अवघान, वाघ, बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे, न्यू बोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. एस. राठोड तसेच वनकर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित चर्चासत्रात अग्रवाल, यादव यांनी छत्तीसगड वनपरिक्षेत्रातील पुनर्वसन, विभागीय वनाधिकारी राहुल गवई यांनी नवरगाव पुनर्वसन, उपवनसंरक्षक महेश खोरे यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात ग्राम परिसर विकास समिती, काजळीद्वारे पारंपारिक लोकनृत्य सादर करण्यात आले. तसेच यावेळी वाघ आणि त्यांच्या अधिवासाच्या सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली. ही रॅली आमगाव चेक पोस्ट, कळमेट कुटी मार्गे अमरावतीकडे रवाना झाली. या रॅलीत ७० सदस्य सहभागी झाले होते.