राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती बारामतीमध्ये आहे. थोरल्या साहेबांना साथ द्यावी की, अजित पवारांबरोबर राहावं, अशा संभ्रमात लोक दिसत आहेत. अशातच अजित पवार यांनी एक पत्र लिहून वेगळा होण्याचा निर्णय का घेतला? याची माहिती दिली. त्यांच्या या पत्र प्रपंचानंतर आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं आहे. “बारामतीकरांची भूमिका” या नावाने हे पत्र व्हायरल झाले आहे. राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले” तसेच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता, ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाला, असा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. या पत्रावर आता राजेंद्र पवार यांनी भूमिका व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेंद्र पवार काय म्हणाले?

“जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, तेव्हा निनावी पत्रातून भावना व्यक्त केल्या जातात. या पत्राच्या माध्यमातून कुणीतरी खदखद व्यक्त केली आहे. मी आणि अजित पवार एकाच वयाचे आहोत. अजित पवार १९८७ साली राजकारणात आले आणि तिथून ते पुढे पुढे जाऊ लागले. शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे कदाचित मीही राजकारणात येईन, असे त्यावेळी लोकांना वाटत होते. पण शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती, व्यवसाय आणि सामाजिक काम करत राहिलो. त्यातूनच मी रोहित पवारला २१ व्या वर्षी एक मंच तयार करून देऊ शकलो”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो, देणगीसाठी स्कॅनर कोडही दिला

मी राजकारणात आलो असतो तर…

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, मला एका साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पण शरद पवार यांनी मला जाणीवपूर्वक दूर ठेवले. मी जर त्यावेळी राजकारणात आलो असतो तर कदाचित आज जी परिस्थिती दिसत आहे, ही त्यावेळीच दिसली असती.

पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं?

“पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळविला. पुढची पिढी जेव्हा तयार होत होती. तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले.”

“मैं मेरी झांसी नहीं दूंगी”, भावना गवळी लोकसभा उमेदवारीसाठी ठाम; म्हणाल्या, “१३ खासदार शिंदेंबरोबर गेलो तेव्हा…”

“दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळूनदेखील घेतले. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास माहितच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली. तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करुन अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, “वाजवा तुतारी गाडा गद्दारी”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter viral in baramati about ajit pawar politics rohit pawar father rajendra pawar explain pawar family history kvg
First published on: 28-02-2024 at 12:50 IST