यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होत आहे. यवतमाळ नजीक भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. ४७ एकर परिसरात उभारलेल्या सभामंडपात दुपारी ४ वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेस उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास दोन लाख महिला या मेळाव्याला येण्याचा अंदाज आहे. मात्र ही सभा आता वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आहे.

मंडपातील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो

आज सकाळी या सभेठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यांच्या मागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो चिटकवलेले असल्याचे दिसून आले. या फोटोंवर एक स्कॅनर कोडही आहे. “१३८ वर्षांपासून एका चागंल्या भारताच्या निर्माणासाठी संघर्ष करत आहोत”, असा संदेश या फोटोवर छापलेला असून त्यावर देणगी मिळविण्यासाठी स्कॅनर कोडही देण्यात आला आहे. त्यामुळे ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची की राहुल गांधींची असा प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे.

वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूर येथे काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत ज्या कंत्राटदाराने खुर्च्या पुरविल्या होत्या. त्याच कंत्राटदाराला यवतमाळच्या सभेचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र कंत्राटदाराने खुर्च्यांवरील फोटो न काढताच त्या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी पुरविल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिल्यानंतर खुर्च्यांवरील स्टिकर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.

निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये सभा घेण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पायंडा कायम

वाहतुकीची गैरसोय

पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी यवतमाळ शहरालगतच्या अनेक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परिक्षार्थींसह बारावीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. आज राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. परिक्षार्थ्यांनी बदललेल्या मार्गाची नोंद घेऊन वेळेवर परिक्षेस पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यवतमाळ : पंतप्रधानांची सभा, रस्ते बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय…

बसेसवर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठ्यांची ड्यूटी

पंतप्रधानांच्या सभेला जिल्ह्यातून महिला उपस्थित राहणार आहे. महिला मेळाव्यात किमान दोन लाख महिला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. विदर्भातील बहुतांश आगारातील बसेस मंगळवारीच यवतमाळ जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचल्या आहेत. या प्रत्येक गावातून लोकसंख्येनुसार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बसवर शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील अनेक एक शिक्षकी शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली. तर उद्या बुधवारीही या शाळा शिक्षकाअभावी बंद राहणार आहेत. बसेस मोदींच्या सभेसाठी व्यस्त राहणार असल्याने बारावीतील परीक्षार्थींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही गैरसोय होणार आहे.